Join us

'बिकीनी घातली म्हणून मला काम...' ट्रोलिंगवर प्रिया बापट थेटच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 14:25 IST

बिकनी ट्रोलिंगवर प्रियाने अगदी परखडपणे तिचं मत मांडलं.

एक गुणी, सोज्वळ आणि तितकीच लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट.प्रिया बापट हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. सोशल मीडियावर प्रिया बापट बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. शिवाय स्वत:चे बोल्ड, ग्लॅमरस फोटोही शेअर करत असते. नुकतेच प्रियाने ऑस्ट्रेलिया टूरमधील बिकिनीतील फोटो शेअर केले होते. पण, काहींनी तिला ट्रोल केलं. यावर प्रियाने अगदी परखडपणे तिचं मत मांडलं. तिच्या वक्तव्याने सार्‍यांचं लक्ष वेधलं आहे. 

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत प्रिया म्हणाली, 'मला असं वाटतं आपण सोयीस्कररित्या मराठी संस्कृतीचे झेंडे घेऊन फिरतो. माझ्या कपड्यांवरुन नाही तर माझं वागणं, आचार-विचार,  घरच्यांची शिकवण, मी चार लोकांसोबत कशी बोलते- कशी वागते, मी माझं काम प्रामाणिकपणे करते की नाही, यावर माझा सुसंस्कृतपणा ठरतो'. 

ती म्हणाली, 'साडी नेसली म्हणजे मी चांगली आणि बिकनी घातली म्हणजे वाईट असं ज्यांना कोणाला वाटत असेल, तर मला त्यांना उत्तरंचं द्यावसं वाटत नाही. ऑस्ट्रेलियामधील बिकिनीतील फोटो शेअर केल्यानंतर मी प्रचंड ट्रोल झाले. पण त्यावेळी मी शांत राहणं पसंत केलं. दुसरीकडे माझ्याच काही चाहत्यांनी माझी बाजू घेतली'.

पुढे ती म्हणाली, 'खूप लोक असे म्हणाले की मला माझ्याकडे काम नाही म्हणून मी असे फोटो शेअर केले. असं काही नसतं. बिकीनी घातली म्हणून काम मिळत नसतं. आपल्या प्रत्येकाचे बेंचमार्क असतात. प्रत्येकाचा एक शरीर असतं. मला माझं शरीर जसे आहे तसे स्वीकारण्यासाठी खूप वेळ लागला.आज मला माझ्या शरीराबद्दल आत्मविश्वास आहे. मी जशी आहे तशी वावरू शकते.  तर स्वत:ला बिकिनीमध्ये आवडले म्हणून घातली. इतर कुणाला मी आवडावी हा तर मुद्दाच नाही'.

प्रियाने काकस्पर्श, टाईमपास-२,  टाईम प्लीज,  मी शिवाजी राजे भोसले बोलतोय,  वजनदार  या मराठी चित्रपटांबरोबरच  मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवलं आहे. शिवाय,  सिटी ऑफ ड्रिम्स’  आणि  आणि काय हवं  ही वेब सिरीज केली आहे. ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ ही प्रियाची वेबसिरीज चांगलीच गाजली होती.  

टॅग्स :प्रिया बापटमराठी अभिनेता