Join us

सायना नेहवाल बायोपिकसाठी परिणीती चोप्राने घेतले कठोर परिश्रम, व्हायरल फोटोत ओळखणं झालंय कठीण

By तेजल गावडे | Updated: November 5, 2020 19:18 IST

बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर बनत असलेल्या चित्रपटात सायनाच्या भूमिकेत परिणीती चोप्रा दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. हा चित्रपट भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर आधारीत आहे. यात परिणीती सायना नेहवालची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी परिणीती दिवसरात्र मेहनत घेते आहे आणि आता समोर आलेल्या फोटोत तिच्या मेहनतीचे परिणाम पहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतो आहे. या फोटोत परिणीती चोप्रा सायना नेहवालसारखी दिसते आहे. सायनाच्या लूकशी साध्यर्म साधण्यासाठी परिणीतीच्या लूकमध्ये खूप बदल झाला आहे. हा फोटो परिणीती चोप्रा फॅन क्लबने शेअर केला आहे. फोटो पाहून चाहते खूप उत्सुक झाले आहेत.

परिणीतीच्या या फोटोने चाहत्यांनाच नाही तर सायना नेहवाललादेखील चकीत केले आहे. सायना नेहवालने तर परिणीतीला तिचे डुप्लिकेट म्हटले आहे. व्हायरल फोटो शेअर करत सायना नेहवालने ट्विटर अकाउंटवर लिहिले की, माझी डुप्लिकेट.

एका मुलाखतीत दरम्यान परिणीतीने सांगितले होते की, ही भूमिका खरंच खूप आव्हानात्मक आहे असं मी मानते. कारण चॅम्पियन बनणं ही काही सहज सोपी गोष्ट नाही. त्यासाठी कठोर तपश्चर्या म्हणजेच कठोर मेहनत लागते. कारण स्पोर्ट्सपर्सन बालपणापासून त्यावर मेहनत घेतात.

अनेक वर्षे मेहनत घेतल्यानंतर ते त्या खेळात प्राविण्य मिळवतात किंवा यश संपादन करतात. या सगळ्या गोष्टी रुपेरी पडद्यावर दाखवता याव्या यासाठी मी माझ्या परिने पूर्णपणे प्रयत्न करेन.

टॅग्स :परिणीती चोप्रासायना नेहवाल