बॉलिवूडच्या फ्रॅन्चायजी सिनेमांपैकी सगळ्यात गाजलेला तो म्हणजे 'हेरा फेरी'. या सिनेमाचे आत्तापर्यंत 'हेरा फेरी' आणि 'फिर हेरा फेरी' असे दोन भाग प्रदर्शित झाले आहेत. लवकरच 'हेरा फेरी ३'देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा पहिला भाग हा २००० साली प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमातील परेश रावल यांनी साकारलेलं बाबुराव हे पात्र प्रचंड गाजलं. आजही त्यावरचे कित्येक मीम्स ही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण, हेरा फेरीमधील बाबू भैय्या म्हणजे गळ्याला फास असल्याचं परेश रावल यांनी म्हटलं आहे.
परेश रावल यांनी नुकतीच लल्लनटॉपला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना हेरा फेरी सिनेमाबद्दल विचारलं असता त्यांनी बाबू भैय्यापासून मुक्ती हवी असल्याचं म्हटलं.
हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास
"हेरा फेरी सिनेमा म्हणजे गळ्याला लागलेला फास. २००६ मध्ये हेरा फेरीचा दुसरा भाग (फिर हेरा फेरी) प्रदर्शित झाला होता. २००७ मध्ये मी विशाल भारद्वाज यांच्याकडे गेलो होतो. त्यांना मी म्हणालो होतो की माझ्याकडे एक सिनेमा आहे. मला हेरा फेरीमधील बाबुरावपासून मुक्ती हवी आहे. तुम्ही त्या सेम गेटअपमध्ये मला वेगळा रोल देऊ शकतो का? जो कोणी पण येतो, हेरा फेरीबद्दल बोलतो. मी एक अभिनेता आहे आणि मला या दलदलमध्ये फसायचं नाही. पण, ते मला म्हणाले की मी भूमिकांचे रिमेक करत नाही".
बाबुरावला कंटाळले परेश रावल
"त्यानंतर मी २०२२ मध्ये आर बल्की यांच्याकडे गेलो. मी त्यांना म्हणालो की मला याच गेटअपमध्ये दुसरं कोणतं तरी कॅरेक्टर द्या. माझी घुसमट होतेय. आनंद तर आहेच पण, हे तुम्हाला बांधून ठेवतं. यापासून तुम्हाला मुक्ती मिळाली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा सीक्वल करता. तुम्ही तीच गोष्ट पुढे घेऊन जाता. पण, यात कोणालाही नाविन्य करायचं नाही. मी नाही केलं तर हा सिनेमा किंवा प्रोजेक्ट होणार नाही, असं वाटतं. पण यातून मला आनंद मिळत नाही".