Join us

परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 16:32 IST

Paresh Rawal Exit from Hera Pheri 3: बाबूराव, राजू अन् श्यामची तिकडी तुटली

Paresh Rawal Quits Hera Pheri 3: सध्या अनेक सिनेमांच्या सीक्वेलची चर्चा आहे. मात्र चाहते एका सीक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. ते म्हणजे 'हेरा फेरी ३' (Hera Pheri 3). परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी या तिकडीने २००० साली 'हेरा फेरी' सिनेमातून धमाल आणली. नंतर २००६ साली 'फिर हेरा फेरी' मध्येही त्यांना तितकंच पसंत केलं गेलं. आता 'हेरा फेरी ३' च्या शूटला सुरुवात झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, परेश रावल यांनी सिनेमातून एक्झिट घेतली आहे.

'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार, परेश रावल 'हेरा फेरी ३' मधून बाहेर पडले आहेत. निर्मात्यांसोबत काही गोष्टींवरुन खटकल्याने त्यांनी सिनेमा सोडला आहे. क्रिएटिव्ह डिफ्रंसमुळे ते बाहेर पडल्याचं आता समोर आलं आहे. परेश राव यांची सिनेमात बाबुराव आपटे ही मुख्य भूमिका आहे. या भूमिकेने त्यांना ओळखही मिळवून दिली. मात्र आता त्यांनी 'हेरा फेरी ३' करणार नाही असा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयामुळे चाहते निराश झालेत. 

बाबुराव आपटे, श्याम आणि राजू ही तिकडी म्हणजे 'हेरा फेरी' सिनेमाचे कर्तेधर्ते आहेत. त्यांच्या अभिनयासाठीच प्रेक्षक सिनेमा पाहतात. सुरुवातीला 'हेरा फेरी ३' मध्ये अक्षय कुमार नसणार अशी चर्चा होती. स्क्रिप्ट आवडली नसल्याने त्याने सिनेमाला नकार दिला होता. मात्र नंतर त्याची अचानक सिनेमात एन्ट्री झाली. तिघांचा सेटवरील फोटोही व्हायरल झाला होता. तसंच लवकरच सिनेमाचा टीझर येईल अशीही चर्चा होती. आता त्याआधी परेश राव सिनेमातून बाहेर पडल्याची बातमी आल्याने सर्वांचीच निराशा झाली आहे.

हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास

काही दिवसांपूर्वीच परेश रावल यांनी त्यांच्या गाजलेल्या बाबूरावच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली होती. या भूमिकेचा आता त्यांना कंटाळा आल्याचं ते म्हणाले होते. परेश राव मुलाखतीत म्हणतात,  "हेरा फेरी सिनेमा म्हणजे गळ्याला लागलेला फास. २००६ मध्ये हेरा फेरीचा दुसरा भाग (फिर हेरा फेरी) प्रदर्शित झाला होता. २००७ मध्ये मी विशाल भारद्वाज यांच्याकडे गेलो होतो. त्यांना मी म्हणालो होतो की माझ्याकडे एक सिनेमा आहे. मला हेरा फेरीमधील बाबुरावपासून मुक्ती हवी आहे. तुम्ही त्या सेम गेटअपमध्ये मला वेगळा रोल देऊ शकतो का? जो कोणी पण येतो, हेरा फेरीबद्दल बोलतो. मी एक अभिनेता आहे आणि मला या दलदलमध्ये फसायचं नाही. पण, ते मला म्हणाले की मी भूमिकांचे रिमेक करत नाही. त्यानंतर मी २०२२ मध्ये आर बल्की यांच्याकडे गेलो. मी त्यांना म्हणालो की मला याच गेटअपमध्ये दुसरं कोणतं तरी कॅरेक्टर द्या. माझी घुसमट होतेय. आनंद तर आहेच पण, हे तुम्हाला बांधून ठेवतं. यापासून तुम्हाला मुक्ती मिळाली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा सीक्वल करता. तुम्ही तीच गोष्ट पुढे घेऊन जाता. पण, यात कोणालाही नाविन्य करायचं नाही. मी नाही केलं तर हा सिनेमा किंवा प्रोजेक्ट होणार नाही, असं वाटतं. पण यातून मला आनंद मिळत नाही."

टॅग्स :परेश रावलअक्षय कुमारसुनील शेट्टीबॉलिवूड