Join us

झोपडीत राहणारी ‘ती’ मिस इंडिया झाली...! 90 च्या दशकातील ही अभिनेत्री आहे परेश रावल यांची पत्नी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 06:00 IST

अशी आहे परेश रावल यांची लव्हस्टोरी! झाडाखाली घेतल्या होत्या लग्नाच्या आणाभाका!!

ठळक मुद्देपरेश आणि स्वरूप पहिल्यांदा 1975 मध्ये एकमेकांना भेटले होते. दोघेही तेव्हा कॉलेजात शिकत.

हेराफेरी, ओह माय गॉड यासारखे यादगार सिनेमे देणारे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल (Paresh Rawal)यांना खरी ओळख मिळाली ती विनोदी भूमिकांमुळे. अक्षय कुमार व त्यांची जोडी कमालीची गाजली. या जोडीने जवळपास २३ सिनेमे एकत्र केलेत. पण आज आम्ही तुम्हाला परेश यांच्या सिने करिअरबद्दल नाही तर त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगणार आहोत.

परेश रावल यांनी मिस इंडिया राहिलेल्या स्वरूप संपत (Swaroop Sampat) यांच्यासोबत लग्न केले. 1979 मध्ये स्वरूप संपत यांनी मिस इंडिया किताब जिंकला होता. दोघांनाही दोन मुले आहेत.

तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल, पण स्वरूप या सुद्धा अभिनयक्षेत्राशी संबंधित आहेत. ‘ये जो जिंदगी है’ या विनोदी मालिकेत स्वरूप यांनी काम केले होते. यानंतर 1984 मध्ये ‘करिश्मा’ या चित्रपटात त्यांनी काम केले. यात त्या कमल हासन आणि रीना रॉय यांच्यासोबत दिसल्या. बिकीनी सीन्स देऊन  त्यांनी खळबळ निर्माण केली होती. यापश्चात नरम गरम, हिम्मतवाला, साथिया, सप्तपदी, की अ‍ॅण्ड का अशा अनेक चित्रपटांत स्वरूप दिसल्या.

स्वरूप यांनी कुंकू बनवणा-या श्रृंगार या कंपनीसाठी मॉडेलिंगही केली होती. स्वरूप आता दिव्यांग मुलांना अभिनय श्किवतात. एका मुलाखतीत स्वरूप यांनी मिस इंडिया स्पर्धेबद्दल सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की, मी मिस इंडियाचा किताब जिंकला तेव्हा अनेकांना विश्वास बसत नव्हता. कारण मी अनेक वर्षे गावात एका झोपडीत राहत होते. स्वरूप चित्रपटांत काम करताना कधीही आरसा बघत नसत. कॉस्च्युम, लूक याबद्दल त्या कधीही चर्चा करत नसत. ‘हिम्मतवाला’ या चित्रटानंतर स्वरूप यांनी इंडस्ट्रीतून काहीसे अलिप्त होत समाजसेवेत स्वत:ला झोकून दिले. अनेक पुस्तकेही त्यांनी लिहिली.

परेश आणि स्वरूप पहिल्यांदा 1975 मध्ये एकमेकांना भेटले होते. दोघेही तेव्हा कॉलेजात शिकत. स्वरूप यांना पहिल्यांदा पाहताच परेश त्यांच्या प्रेमात पडले होते. स्वरूप यांना पहिल्यांदा पाहिल्यानंतर मी याच मुलीशी लग्न करणार, असे परेश आपल्या एका मित्राला म्हणाले होते. पण यानंतर एक वर्ष परेश स्वरूप यांच्याही साधे बोललेही नव्हते.याचदरम्यान स्वरूप यांनी एकदा परेश यांना स्टेज परफॉर्मन्स देताना प्रथम पाहिले आणि त्या परेश यांच्या फॅन बनल्या. बॅक स्टेजवर जात त्यांनी तू कोण? असा थेट प्रश्न परेश यांना केला. यानंतर दोघांत मैत्री झाली आणि नंतर प्रेम.  मुंबईच्या लक्ष्मीनारायण मंदिरात दोघांचेही लग्न झाले. मंडपाऐवजी दोघांनीही एका मोठ्या झाडाखाली लग्नाच्या आणाभाका घेतल्या.    

टॅग्स :परेश रावल