Join us  

'त्यांनी मला एका बेंचवर बसायला सांगितलं आणि त्यानंतर..'; पंकज त्रिपाठींनी सांगितला पहिल्या ऑडिशनचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 11:59 AM

Pankaj tripathi:अलिकडेच पंकज त्रिपाठी यांनी 'आप की अदालत' या कार्यक्रमात त्यांच्या पहिल्या सिनेमाच्या ऑडिशनचा किस्सा सांगितला.

बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी सध्या त्यांच्या 'मैं अटल हूँ' या सिनेमामुळे चर्चेत येत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात पंकज त्रिपाठी भारताचे माजी पंतप्रधान अट बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहे. अलिकडेच त्यांचा या सिनेमाती फर्स्ट लूकही प्रदर्शित झाला. तेव्हापासून ते सातत्याने चर्चेत येत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी अलिकडेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या फिल्मी करिअरवर प्रकाश टाकला. यावेळी बोलत असताना दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्या सिनेमात पहिल्यांदाच काम केल्यानंतर त्यांना कशाप्रकारे वागणूक मिळाली हे त्यांनी सांगितलं.

अलिकडेच पंकज त्रिपाठी यांनी 'आप की अदालत'मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक किस्से शेअर केले. मुंबईत काम शोधायला आलेल्या पंकज त्रिपाठी पहिल्यांदाच रामगोपाल वर्मा यांच्या सिनेमासाठी ऑडिशन देण्यासाठी गेले होते. या ऑडिशनच्या वेळी त्यांना कशा प्रकारचा अनुभव आला हे त्यांनी सांगितलं.

"एक दिवस मला रामगोपाल वर्मा यांच्या ऑफिसमधून फोन आला. मी ऑडिशनच्या ठिकाणी पोहोचलो त्यावेळी त्यांनी मला एका बेंचवर बसायला सांगितलं. या बेंचवर ४ लोक बसू शकत होते. त्या बेंचवर त्यांनी मला कडेला बसायला सांगितलं. मी त्या जागेवर बसल्यानंतर ते सतत माझ्याकडे पाहात होते. त्यानंतर त्यांनी मला जायला सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला कधीच पुन्हा बोलावलं नाही. जर त्यावेळी त्यांनी मला कास्ट केलं असतं तर आम्हा दोघांचं नुकसान झालं असतं", असं पंकज त्रिपाठी म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "एका सिनेमात चक्क गुंडाची भूमिका साकारुन मी लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न केला. पण, माझा तो प्रयत्न अयशस्वी ठरला. एकदा मी रामगोपाल वर्मा यांच्या ऑफिमध्ये पोहोचलो गुंडाच्या भूमिकेसाठीचं ऑडिशन होतं. पण, माझ्यापूर्वीच तिथे अनेक गुंडांसारखे दिसणारे लोक होते. मी त्यांना विचारलं, तुम्ही अभिनेता आहात? तर ते हो म्हणाले. त्यावर, मग तुम्ही इतका डेंजर का दिसताय असं विचारलं. त्यावर, रामगोपाल वर्मा अशाच खतरनाक लोकांना कास्ट करतात असं उत्तर त्यांनी मला दिलं."

दरम्यान, पंकज त्रिपाठी यांचा 'मैं अटल हूँ' हा सिनेमा १९ जानेवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं आहे. 

 

टॅग्स :पंकज त्रिपाठीबॉलिवूडअटलबिहारी वाजपेयीसिनेमारवी जाधवराम गोपाल वर्मा