अभिनेत्री पल्लवी जोशीला (Pallavi Joshi) मराठीत 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'ची सूत्रसंचालिका म्हणून खूप लोकप्रियता मिळाली. पल्लवीने बालवयातच कामाला सुरुवात केली होती. मराठी नाटक, टीव्ही शो, सिनेमा, हिंदी चित्रपटांमध्ये ती दिसली. मात्र गेल्या काही काळापासून ती फक्त तिचा नवरा विवेक अग्निहोत्रींच्याच सिनेमांमध्ये दिसत आहे. याचं कारण विचारलं असता तिने आपल्याला बाहेरुन ऑफर्स येणंच बंद झालं होतं असा खुलासा केला. नक्की काय म्हणाली पल्लवी जोशी?
नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पल्लवी जोशी म्हणाली, "विवेक माझ्यासाठी भूमिका लिहितो त्यासाठी मी त्याचे आभारच मानते. कारण मला बाहेरुन सिनेमे ऑफर होणंच बंद झालं होतं त्यामुळे मी कमीत कमी त्याच्या सिनेमांमध्ये तरी काम करते. २००४-५ सालापासून मला कामच मिळालं नाही. माझ्या दोन चांगल्या मैत्रिणी रेणुका शहाणे आणि मृणाल यांनीच फक्त मला कास्ट केलं. नाहीतर मला काहीच ऑफर्स येत नव्हत्या."
ती पुढे म्हणाली, "मला तेच तेच टीव्ही डेली सोपबद्दल विचारणा झाली जे मला करायचे नव्हते. त्यात काही खास भूमिका नसते. एकतर आईचा रोल असतो किंवा सासूचा. मालिकांच्या कथा तर कधीही कशाही पलटी मारु शकतात. मिकांची सुरुवात आणि शेवट नक्की कसा आहे हे जाणून घेणं मला खूप महत्वाचं वाटतं. मधल्या काळात अभिनय करत नव्हते म्हणून मग मी माझी प्रोडक्शन कंपनी सुरु केली. मी २००० साली दोन मराठी सिनेमेही बनवले. मग आमचं होम प्रोडक्शन सुरु झालं."
ऑफर्स येणं बंद होण्यामागचं काय कारण होतं?
यावर पल्लवी म्हणाली, "मलाही कल्पना नाही. मधल्या काळात २००० च्या आसपास माझ्या काळातल्या बऱ्याच अभिनेत्री घरी बसल्या होत्या. यांना खूप पाहिलं आता नवीन चेहऱ्यांना घ्या असंच चलन झालं होतं. माझ्यासह अनेक अभिनेत्रींचं यामुळे नुकसान झालं. नीना गुप्ता यांनी तर ट्विटरवर काम द्या असं टाकलं होतं. नंतर त्यांना काम मिळालं. नाही तर त्याही कित्येक वर्ष घरीच होत्या. हे फारच दु:खद आहे. जे चांगले कलाकार असतात त्यांना चांगल्या भूमिकांची अपेक्षा असते यात गैर काय."