अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहत असते. अलिकडेच तिने पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरला पाठिंबा देत तिला भारतातच राहू दे असं म्हटलं होतं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परतण्यास सांगितले होते. त्यावेळी राखीने ती देशाची सून असून तिला इथेच राहू दे असं म्हटलं होतं. त्यानंतर आता तिचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात ती पाकिस्तानला समर्थन करत त्यांचा उदो उदो करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत आणि ते तिला देशातून हाकलून लावा अशी मागणी करत आहेत.
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत चालला आहे. भारतानेसुद्धा पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. या हल्ल्याचा निषेध करत देशभरातील सेलिब्रेटींपासून सामान्य जनता पाकिस्तानला चांगलाच धड शिकवण्याची विनंती मोदी सरकारकडे करत आहेत. अशा परिस्थितीत राखी सावंत पाकिस्तानला पाठिंबा देताना दिसतेय. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात ती प्रतिज्ञा घेताना दिसतेय. ती म्हणते की, मी राखी सावंत आहे. मी खरं बोलेन. खऱ्याशिवाय काही बोलणार नाही. पाकिस्तानवाले मी तुमच्यासोबत आहे. जय पाकिस्तान! राखीचा हा व्हिडीओ पाहून सर्वजण तिच्यावर संतापले आहेत आणि ते तिला भारताबाहेर हाकलण्याची मागणी करत आहेत. तिचे नागरिकत्व रद्द करून तिच्यावर देशद्रोहाची कारवाई करण्यासाठी सांगत आहेत.
राखीला बनायचे होते पाकिस्तानची सूनबाई
काही महिन्यापूर्वी राखी सावंतला पाकिस्तानची सून बनायचे होते. यावेळी तिने डोडी खानसोबत लग्न करत असल्याचे सांगितले होते. लग्नानंतर दुबईत स्थायिक होणार असल्याचे म्हटले होते. पण नंतर त्यांच्या गोष्टी जमून आल्या नाहीत. त्यावेळी तिने भारत-पाकिस्तानचे संबंध सुधारण्यासाठी हे करत असल्याचे सांगितले होते. सध्या राखी सावंत दुबईत आहे.