Join us

‘पद्मावती’ क्लॅशवर अक्षयकुमारने थोपटले दंड; म्हटले ‘पॅडमॅन’ ठरलेल्या तारखेलाच रिलीज होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 21:28 IST

येत्या २५ जानेवारी रोजी बॉक्स आॅफिसवर ‘पॅडमन’ आणि ‘पद्मावती’ या दोन मोठ्या चित्रपटांचा क्लॅश होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर!

अभिनेत्री दीपिका पादुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर स्टारर ‘पद्मावती’ हा चित्रपट अगोदर १ डिसेंबर २०१७ रोजी रिलीज होणार होता. परंतु करणी सेना आणि काही राजकीय संघटनांकडून तीव्र विरोध झाल्याने चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट येत्या २५ जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. मात्र याच दिवशी बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार स्टारर ‘पॅडमॅन’ हादेखील रिलीज होणार असल्याने दोघांमध्ये क्लॅश होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी क्लॅशबद्दल स्पष्टीकरण दिले नसल्याने त्यांच्यातील फाइट अटळ समजली जात आहे. दरम्यान, अक्षयकुमारने ‘पॅडमॅन’ ठरलेल्या तारखेलाच रिलीज होणार असल्याचे स्पष्ट केल्याने, ‘पद्मावती’च्या निर्मात्यांकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अक्षयकुमारने याबाबतची अधिकृत घोषणा करताना म्हटले की, ‘चित्रपटांच्या क्लॅशबद्दल जे काही होत आहे, त्याविषयी मला तसूभरही माहिती नाही. तसे झाल्यास त्याचे काय परिणाम होतील, याचाही मी विचार केला नाही. त्यामुळे ‘पॅडमॅन’ २५ जानेवारीलाच रिलीज होणार आहे. ‘पॅडमॅन’ निर्मात्यांमधील प्रेरणा अरोरा यांनी सांगितले की, ‘पद्मावती’ खूपच महत्त्वाचा चित्रपट आहे. चित्रपट खूपच अर्थपूर्ण असल्याने तो लवकरात लवकर रिलीज व्हायला हवा. मीसुद्धा हा चित्रपट बघू इच्छिते. या चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेचा निर्णय घेणे वायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि संजय लीला भन्साळी प्रोडक्शनवर अवलंबून आहे.  जेव्हा प्रेरणाला ‘पद्मावती या बिग बजेट चित्रपटाला पॅडमॅन क्लॅश होत असल्याने चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्याचा काही विचार केला जात आहे काय?’ असे विचारले असता, प्रेरणाने म्हटले की, ‘आम्ही २५ जानेवारी रोजीच चित्रपट रिलीज करणार आहोत.’ दरम्यान, काही बातम्यांनुसार पद्मावती ९ फेब्रुवारी रोजी रिलीज होण्याची शक्यता आहे.