Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘पद्मावत’चा वाद तापणार! करणी सेनेची प्रसून जोशींना राजस्थानात पाय ठेवू न देण्याची धमकी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 12:32 IST

राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात व हरियाणा या राज्यांनी ‘पद्मावत’ या चित्रपटावर लादलेल्या बंदीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतरही  करणी सेनेचे आंदोलन ...

राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात व हरियाणा या राज्यांनी ‘पद्मावत’ या चित्रपटावर लादलेल्या बंदीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतरही  करणी सेनेचे आंदोलन आणि बयानबाजी सुरु आहे. गुरूवारी ‘पद्मावत’ विरोधात देशभर हिंसक निदर्शने केल्यानंतर आता करणी सेनेने सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना धमकी दिली आहे. प्रसून जोशींना यापुढे राजस्थानमध्ये पाय ठेवू देणार नाही, असे करणी सेनेने म्हटले आहे. काल करणी सेनेने बिहारच्या मुजफ्फरपूर येथे एका सिनेमा हॉलमध्ये धिंगाणा घातला. सदस्यांनी सिनेमा हॉलची तोडफोड करत, येथील चित्रपटांचे पोस्टर फाडले. आम्ही कुठल्याही स्थितीत ‘पद्मावत’ रिलीज होऊ देणार नाहीत. हा चित्रपट रिलीज झाला तर जनता कफ्यू लावेल, असे करणी सेनेचे प्रमुख महिपाल मकराना म्हणाले. येत्या २५ जानेवारीला ‘पद्मावत’ संपूर्ण देशभर रिलीज होणार आहे. त्यापूर्वी करणी सेनेने आपले आंदोलन अधिक तीव्र केले आहे. ‘पद्मावत’ प्रदर्शनाच्या विरोधात येत्या २४ जानेवारीला राजपूत महिला चित्तोडमध्ये ‘जोहार’ करतील, असेही करणी सेनेने जाहिर केले आहे. ‘जोहार’साठी १८२६ महिला राजी झाल्या असल्याचे मकराना यांनी सांगितले. अलाऊद्दीन खिल्जीने युद्ध छेडले आणि या लढाईत चित्तोडचे अनेक सैनिक मारले गेले. युद्धात राजा रतनसिंह यांचाही मृत्यू झाला. चित्तोडचा अभेद्य किल्ला मुघलांनी भेदला. पण मुघलांच्या हाती लागण्यापेक्षा किल्ल्यातल्या स्त्रियांनी सती जाण्याचा निर्णय घेतला. राणी पद्मावतीने किल्ल््याच्या आत चितेत उडीत घेण्याचा निर्णय घेतला. स्त्रियांना बंदी बनवण्यास खिल्जीने किल्ल्यात प्रवेश करताच राणी पद्मावती यांच्यासह सुमारे १६ हजार महिलांनी सामूहिक चितेमध्ये उडी घेतली. सतीच्या या प्रकारालाच राजस्थानमध्ये ‘जोहार’ म्हणतात. शूटींगच्या पहिल्या दिवसापासून भन्साळींचा ‘पद्मावत’ वादात सापडला आहे. अनेक वादानंतर काही दुरूस्त्यांसह सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या रिलीजला परवानगी दिली. पण यानंतरही करणी सेनेने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी लावून धरलीय.  हा विरोध फक्त राजस्थान पुरता मर्यादित नाही आहे तर देशातल्या अन्य राज्यांमध्ये समान स्थिती आहे. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात सारख्या राज्यांमध्येही ‘पद्मावत’ला जोरदार विरोध होतो आहे.