Oscar 2025 : चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्कर. या पुरस्कारावर स्वत:चे नाव कोरण्याचे अनेक कलाकारांचे स्वप्न असते. भारतीय चित्रपटांचंही ऑस्कर मिळवण्याचं स्वप्न फार पूर्वीपासून राहिलेलं आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' चित्रपट नॉमिनेट झाल्याने सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पण, किरण राव दिग्दर्शित ( Kiran Rao) 'लापता लेडीज' (Lost Ladies) ९७ व्या ऑस्कर पुरस्कार २०२५ च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता लवकरच ऑस्कर २०२५ हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. ऑस्कर पुरस्कारासाठीची नामांकने १७ जानेवारीला जाहीर होणार आहेत. ऑस्कर पुरस्कार सोहळा २ मार्च रोजी होणार आहे. यामध्ये विजेते घोषित केले जातील.
यंदा भारताकडून 'लापता लेडीज' (Lost Ladies) ऑस्करसाठी अधिकृत एंट्री म्हणून पाठवला होता. पण, भारताचं स्वप्न भंगलं आहे. अंतिम १५ चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश होऊ शकला नाही. अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने (AMPAS) बुधवारी सकाळी ही घोषणा केली. पण, हिंदी भाषेत चित्रीत केलेल्या ब्रिटीश-भारतीय 'संतोष' या चित्रपटानं १५ चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. पण, हा चित्रपट ब्रिटनचे प्रतिनिधित्व करणार आहे. ज्याप्रमाणे भारताने 'लापता लेडीज'ची निवड केली होती. त्याप्रमाणे यूकेने 'संतोष' या चित्रपटाची निवड केली होती. हा सिनेमा संध्या सुरी यांनी दिग्दर्शित केला आहे.
'लापता लेडीज' (Lost Ladies) बाहेर पडला असला तरी भारताच्या अजून आशा संपलेल्या नाहीत. गुनीत मोंगा कपूर निर्मित लाइव्ह-ॲक्शन शॉर्ट फिल्म 'अनुजा' (Guneet Monga short film Anuja) शॉर्टलिस्ट झाली आहे. ही शॉर्ट फिल्म वस्त्रोद्योगातील बालमजुरीच्या समस्येवर भाष्य करते. यामध्ये मराठी अभिनेता नागेश भोसलेसह अनेक कलाकार आहेत. ऑस्कर अकादमीचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर म्हणाले, "१८० लघुपटांमधून 'अनुजा' या लाइव्ह-ॲक्शन शॉर्टफिल्मची निवड करण्यात आल्याचा मला आनंद झाला आहे. गुनीत मोंगा ही या शॉर्ट फिल्मची कार्यकारी निर्माती आहे".
'लापता लेडीज' यावर्षी १ मार्च रोजी रिलीज झाला होता. नितांशी गोयल, प्रतिभा रांटा, स्पर्श श्रीवास्तव आणि रवी किशन यांची सिनेमात मुख्य भूमिकेत होत्या. तसंच छाया कदम या मराठमोळ्या अभिनेत्रीनेही उत्तम भूमिका साकारली होती. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने फारसं यश कमावलं नाही. पण जेव्हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला तेव्हा प्रत्येकाच्या तोंडावर 'लापता लेडीज'चं च नाव होतं. या चित्रपटाला भारतात प्रेक्षकांचे व समीक्षकांचे खूप प्रेम मिळाले होतं.