करणी सेनेचा ‘पद्मावत’लाही विरोध; भाजपा सरकार अन् सेन्सॉर बोर्डाला दिला इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 19:29 IST
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाचा विरोध थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. आता चित्रपटाची रिलीज डेट ...
करणी सेनेचा ‘पद्मावत’लाही विरोध; भाजपा सरकार अन् सेन्सॉर बोर्डाला दिला इशारा!
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाचा विरोध थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. आता चित्रपटाची रिलीज डेट रिलीज झाली असून, ‘पद्मावती’ऐवजी ‘पद्मावत’ या नावाने येत्या २५ जानेवारी रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. परंतु ‘पद्मावत’लाही करणी सेनेचा विरोध असल्याने, पुन्हा एकदा चित्रपट अडचणीत सापडला आहे. १ डिसेंबर २०१७ रोजी हा चित्रपट रिलीज होणार होता. मात्र विविध राजपूत संघटनांनी त्यास कडाडून विरोध केल्याने चित्रपट अडचणीच्या भोवºयात सापडला होता. त्यावर तोडगा म्हणून सेन्सॉर बोर्डाने काही कट आणि नाव बदलून चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला. मात्र तरीदेखील विरोध थांबला नसल्याने अजूनही प्रदर्शनाच्या वाटेत अनेक अडचणी आहेत, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. दरम्यान, ‘पद्मावती’ चित्रपटाच्या प्रदर्शनासंबंधी सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये ठरलेला तडजोडीचा फॉर्म्युला करणी सेनेने फेटाळून लावला. ‘पद्मावत’ हे जरी नाव निश्चित केले असले तरी, आमचा विरोध कायम राहणार असल्याचे काही संघटनांनी स्पष्ट केले. तर करणी सेना चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीवर ठाम असल्याने प्रदर्शनाची वाट बिकट असल्याचे दिसून येत आहे. करणी सेनेने तर सेन्सॉर बोर्डालाच आता धमकी दिली आहे. चित्रपट जर प्रदर्शित झाला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे करणी सेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावती’च्या प्रदर्शनावर तोडगा काढण्यासाठी निर्मात्यांना काही बदल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार निर्मात्यांनीही तसे बदल करण्यास समर्थता दर्शविली. परंतु हे बदल करणी सेनेला मान्य नसल्याने विरोधाची धार आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जे काही होईल त्याला भाजपा सरकार आणि सेन्सॉर बोर्ड जबाबदार असेल, असा इशारा करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेडी यांनी दिल्याने, हे प्रकरण आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.