जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर दिले. या कारवाईवर आधारित एक देशभक्तीपर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
निक्की विकी भगनानी फिल्म्स आणि द कंटेंट इंजिनिअर या प्रोडक्शन हाऊसेसने या चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा केली असून 'ऑपरेशन सिंदूर' हे शीर्षक कायदेशीररित्या त्यांच्या नावावर नोंदवले गेले असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टरही सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन उत्तम आणि नितीन हे संयुक्तपणे करणार असून, सध्या चित्रपटाचे कास्टिंग प्रक्रिया सुरू आहे. या सिनेमात कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका या वास्तविक अधिकाऱ्यांच्या भूमिकाही समाविष्ट करण्यात येणार आहेत.
चित्रपटाचे एकूण बजेट सुमारे ५० कोटी रुपये ठेवण्यात आले आहे. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटातून होणाऱ्या कमाईपैकी ५०% रक्कम भारतीय सैन्य आणि पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबियांना दिली जाणार आहे.
चित्रपट हिंदीसह इंग्रजी भाषेतही प्रदर्शित केला जाणार आहे. कथानकासाठी सखोल संशोधन केले जाईल, तसेच सशस्त्र दलांचे अधिकारी, संरक्षण मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाकडून मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्नही केला जात आहे.
चित्रपटाच्या घोषणेनंतर काहींनी निर्मात्यांच्या हेतूंवर प्रश्न उपस्थित केले, मात्र दिग्दर्शकाने सोशल मीडियावर माफी मागून या प्रकल्पाचा उद्देश केवळ देशभक्ती आणि शहीद जवानांना श्रद्धांजली देणे असल्याचे स्पष्ट केले आहे.