जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशातील लोक संतापले आहेत. सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांनीदेखील या घटनेचा तीव्र निषेध करत कठोर पावले उचलण्याची मागणी केलीय. दरम्यान प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगार आणि शेजारी देश पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर दिग्गज गीतकार जावेद अख्तर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, असे पहिल्यांदा घडले नाही तर अनेकदा घडले आहे. मी केंद्र सरकारला विनंती करतो की, आता कठोर पावले उचला. सीमेवर काही फटाके फोडून काम चालणार नाही. आता काहीतरी ठोस पावले उचलली पाहिजेत. काहीतरी असे करा की तिथला (पाकिस्तान) जो वेडा लष्कर प्रमुख आहे, कोणी समजूतदार व्यक्ती त्याच्यासारखे भाषण करु शकत नाही. तो म्हणतो की, हिंदू आणि मुसलमान वेगवेगळा समुदाय आहे. त्याला या गोष्टीची अजिबात पर्वा नाही की, त्याच्या देशातही हिंदू आहे. त्यांना काही इज्जत नाही आहे का? तो कसा माणूस आहे ? त्यांना सडेतोड उत्तर मिळालेच पाहिजे म्हणजे त्यांच्या कायम लक्षात राहील. मला राजकारणाबद्दल जास्त माहित नाही. पण मला इतकं माहित आहे की, आता आर-पार करण्याची वेळ आली आहे.
पाकिस्तानी कलाकारांवर आणलेल्या बंदीवर जावेद अख्तर म्हणाले...अलिकडेच पाकिस्तानी कलाकार फवाद खानचा सिनेमा अबीर-गुलालच्या प्रदर्शनाला भारतात बंदी आणली आहे. हा निर्णय पहलगाममध्ये झालेल्या दहशतावादी हल्ल्यानंतर घेण्यात आला आहे. यादरम्यान पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले होते की, पहलगाममध्ये जे झाले त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये कोणतेच मैत्रीपूर्ण वातावरण नाही. अशा परिस्थितीत, पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची परवानगी द्यावी का असा प्रश्न विचारणे चुकीचे आहे. दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील तेव्हा हा प्रश्न चांगल्या काळात उपस्थित केला जाऊ शकतो, परंतु सध्या ते शक्य नाही. जावेद म्हणाले की, भारताने नेहमीच पाकिस्तानी कलाकारांचे स्वागत केले आहे, परंतु पाकिस्तानकडून अशी वृत्ती कधीही दिसून आलेली नाही.
पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाउंट केले बॅनभारतात पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या युट्यूब चॅनेलवर आधीच बंदी आणली. भारत सरकारने १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर रोख लावला आहे, ज्यात डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाई न्यूज आणि जियो न्यूज यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. त्यानंतर त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटदेखील भारतात बॅन करण्यात आले. हानिया आमिर आणि माहिरा खानसारख्या लोकप्रिय कलाकारांचे अकाउंटदेखील भारतात बॅन करण्यात आले.