Join us

​‘सेक्सी दुर्गा’ला सेन्सॉर बोर्डाची ‘नो एन्ट्री’! वाचा काय आहे प्रकरण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 15:27 IST

सेन्सॉर बोर्ड पुन्हा चर्चेत आहे. होय, ‘सेक्सी दुर्गा’ या मल्याळम चित्रपटाच्या निर्माता व दिग्दर्शकाने सेन्सॉर बोर्डाविरोधात बंड पुकारले आहे. ...

सेन्सॉर बोर्ड पुन्हा चर्चेत आहे. होय, ‘सेक्सी दुर्गा’ या मल्याळम चित्रपटाच्या निर्माता व दिग्दर्शकाने सेन्सॉर बोर्डाविरोधात बंड पुकारले आहे. देशातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा चित्रपट महोत्सव म्हणून ओळखल्या जाणा-या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  अर्थात ‘मामि’ महोत्सवात ‘सेक्सी दुर्गा’ प्रदर्शित करण्यास सेन्सॉर बोर्डाने मनाई केली आहे. या चित्रपटामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावू शकतात, असा माहिती व प्रसारण मंत्रालयाचा निष्कर्ष आहे. याच निष्कर्षाच्या आधारावर सेन्सॉर बोर्डाने ‘सेक्सी दुर्गा’ला मनाई केली आहे. पण ‘सेक्सी दुर्गा’च्या दिग्दर्शक व निर्मात्याने मात्र या निर्णयाविरोधात आवाज उठवला आहे. तिरूवनंतपुरमचे स्वतंत्र चित्रपट निर्माते व  दिग्दर्शक सनल कुमार शशिधरन यांच्या ‘सेक्सी दुर्गा’ या चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत.आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, रॉटरडॅम (आयएफएफआर)मध्ये गत २३ वर्षांत पुरस्कार जिंकणारा हा पहिला भारतीय चित्रपट आहे. असे असताना ‘मामि’मध्ये या चित्रपटाला एन्ट्री नाकारली जाणे, यामुळे शशिधरन निराश आहेत. त्यांच्या मते, या चित्रपटाचा आणि धार्मिक भावनांचा काहीही संबंध नाही. शशिधरन यांनी सांगितले की, मी सेन्सॉर बोर्डाला फेरविचार करण्याची विनंती केली आहे. मला सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. मला न्यायाची अपेक्षा आहे. पण असे न झाल्यास मी न्यायालयात जाईल. कारण हा केवळ चित्रपटाचा नाही तर माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि कलास्वातंत्र्याचा प्रश्न आहे. मी या चित्रपटासाठी काहीही करायला तयार आहे. भारतात दुर्गा नाव कॉमन आहे. हे केवळ देवीचे नाव नाही. तर अनेक महिलांचे नाव दुर्गा आहे. एका चित्रपटाला दुर्गा नाव दिल्याने लोकांच्या भावना दुखावतात. पण  दुर्गा नावाच्या एखाद्या महिलेवर अत्याचार झाला तर हा समाज पेटून ऊठत नाही. हाच इथला विरोधाभास आहे,असेही ते म्हणाले. केवळ शीर्षकावरून चित्रपटाला विरोध करणे गैर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.‘सेक्सी दुर्गा’ या चित्रपटात राजश्री देशपांडे आणि कन्नन नायर मुख्य भूमिकेत आहेत. एका पुरूषप्रधान समाजात न्यायासाठी लढणा-या महिलेची कथा यात दाखवली गेली आहे.