Join us

"तुमच्या कॉलर ट्यूनचा त्रास होतो.."; नेटकऱ्याने बिग बींना सुनावलं, अमिताभ म्हणाले- "सरकारला जाऊन सांग"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:20 IST

बिग बी तुमच्या आवाजातील कॉलर ट्यूनचा त्रासस होतोय, असं एक नेटकरी अमिताभ यांना म्हणाला. तेव्हा अमिताभ यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. केंद्र सरकारच्या सायबर क्राइमविरोधी जनजागृती मोहीमेसाठी त्यांच्या आवाजात तयार केलेली कॉलर ट्यून देशभरात वाजत आहे. या ट्यूनमध्ये अमिताभ नागरिकांना सायबर फ्रॉडपासून सावध राहण्याचे आवाहन करतात. मात्र, ही कॉलर ट्यून अनेकांना त्रासदायक वाटत असल्याने काही नेटिझन्सनी सोशल मीडियावर बच्चन यांच्यावर टीका केली आहे. त्यावर बिग बींनी काय उत्तर दिलं बघा.

नेटकऱ्याने सुनावलं, बिग बी म्हणाले..

एका युजरने ट्विटर (X) वर लिहिले, “फोन उचलण्याआधी फक्त बच्चनसाहेबांचा आवाज ऐकू येतो. कंटाळा आला आहे आता.” यावर अमिताभ बच्चन यांनी सौम्य पण रोखठोक उत्तर देत स्पष्ट केलं, “सरकारच्या सांगण्यावरून मी हे केलं आहे. मला सांगण्यात आलं, म्हणून मी केलं. आता तुम्हाला त्रास होत असेल, तर सरकारला जा आणि सांगा.” अशाप्रकारे बिग बींच्या उत्तराने नेटकऱ्याची बोलती बंद झाली.

अमिताभ बच्चन यांच्यावर “बुद्धा सठिया गया है” अशीही एक टिका करण्यात आली होती. यावर त्यांनी अत्यंत शांत आणि ठामपणे उत्तर देत लिहिलं, “हे बोलणं अत्यंत असंवेदनशील आहे. पण काळच असा असतो. जो वयोमानाने वृद्ध होतो, तोच खरा ज्ञानी असतो. आणि देव करो, तुम्ही सुद्धा पुढे वयस्कर व्हाल”

अनेकांनी बच्चन यांना समर्थन दिलं असून, सरकारच्या सामाजिक मोहीमेत सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक केलं आहे. काहींनी मात्र ही कॉलर ट्यून हटवावी, अशी मागणी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. सध्या भारतात अनेक नागरिक सायबर फ्रॉडच्या झळा सहन करत असल्याने सरकार अशा प्रकारे जनतेला जागरूक करत आहे. अमिताभ बच्चन यांनी यासाठी आपला आवाज दिला असून, त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. मात्र त्यांनी अत्यंत समजूतदारपणाने आणि जबाबदारीने उत्तर दिलं आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनबॉलिवूड