Join us

नील नितीन मुकेशच्या रिसेप्शनला अमिताभ आणि रेखा यांचा असाही 'सिलसिला' !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 17:21 IST

मुंबईत अभिनेता नील नितीन मुकेश आणि रुक्मिणी यांचं वेडिंग रिसेप्शन शुक्रवारी पार पडलं. मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या या ...

मुंबईत अभिनेता नील नितीन मुकेश आणि रुक्मिणी यांचं वेडिंग रिसेप्शन शुक्रवारी पार पडलं. मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या या रिसेप्शनला अवघं तारांगण अवतरलं होतं. चित्रपटसृष्टीचे शहेनशाह महानायक बिग बी अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिनेत्री रेखा, सलमान, कॅटरिना यांच्यासह बॉलिवूडचे दिग्गज सेलिब्रिटी या खास सोहळ्यासाठी हजर होते. मात्र सा-यांच्या नजरा आकर्षित झाल्या ज्यावेळी या कार्यक्रमात अमिताभ आणि अमिताभ समोरासमोर आले. आम्ही असे का म्हणतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र या सोहळ्याचे खास फोटो समोर आल्यानंतर ही बाब समोर आली आहे. या मागेही एक किस्सा आहे. हा किस्सा आहे लव्हस्टोरीचा. जी लव्हस्टोरी सिलसिला म्हणूनही प्रसिद्ध आहे. ती लव्हस्टोरी म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांचा हा सिलसिला. रेखा यांचं बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावरील प्रेम लपून राहिलेलं नाही. अनेकदा यांच्या या सिलसिल्याच्या स्टोरी रंगवून रंगवून रंगवल्या गेल्या. बिग बी अमिताभ यांच्यावरील प्रेम रेखा कधीच लपवू शकल्या नाहीत. त्यांचं हेच प्रेम पुन्हा एकदा पाहायला मिळालं. नील नितीन मुकेशच्या रिसेप्शनला रेखा सुवर्ण रंगाची भरजरी कांजीवरम साडी घालून अवतरल्या. केसात माळलेला गजरा आणि दागदागिने यामुळे रेखा यांचं सौंदर्य आणखीनच खुललेलं पाहायला मिळत होतं. मात्र यावेळी रेखा यांच्या बाजूला सावलीप्रमाणे असणारी एक व्यक्ती सा-यांचं लक्ष वेधून घेत होती. ही व्यक्ती म्हणजे रेखा यांची सेक्रेटरी फरजाना.मात्र फरजानाने सा-यांचं लक्ष वेधून घेण्याचं कारण म्हणजे तिचा हुबेहूब बिग बी अमिताभ यांच्यासारखा लूक. तिचे केस, तिने परिधान केलेले कपडे, चालणं सारं काही बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासारखंच.त्यामुळे रेखा यांच्यासोबत दस्तुरखुद्द अमिताभ बच्चनच चालतायत की काय असा भास काहींना झाला. अभिनेत्री रेखा यांनी कायम आपलं वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवलं, त्यांच्या आयुष्याबाबत नवनवीन चर्चाही कायम ऐकायला मिळतात. त्यांच्या जीवनाचा अविभाज्य अंग म्हणजे बिग बी अमिताभ यांच्यावर असलेले त्यांचं प्रेम. बिग बींसोबत आयुष्य घालवण्याचं रेखा यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं असलं तरी अमिताभ रुपी फरजानासोबत रेखा राहतात. नील नितीन मुकेश यांच्या सोहळ्यात बिग बी अमिताभ बच्चन आणि फरजाना अचानक समोरासमोर आले आणि सारेच आश्चर्यचकीत झाले. आपल्यासारखा सेम टू सेम लूक पाहून काही काळ बिग बी सुद्धा गोंधळले. मात्र लगेचच त्यांची नजर रेखा यांच्यावर पडली आणि सारं काही न बोलता न सांगता बिग बी अमिताभ समजून गेले असतीलच नाही का ?