नील नितिन मुकेश (neil nitin mukesh) हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. नीलची प्रमुख भूमिका असलेली 'है जुनुन' ही वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली. या वेबसीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटदरम्यान नीलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत तो अभिनेत्री अनुष्का सेनवर चांगलाच भडकलेला दिसला. या व्हिडीओमुळे नीलला खूप ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं होतं. नील खरंच अनुष्कावर ओरडला होता? काय घडलं होतं नेमकं? याचा खुलासा त्याने केला आहे.
नीलने त्या व्हायरल व्हिडीओवर दिलं स्पष्टीकरण
त्या व्हायरल व्हिडीओवर नील नितिन मुकेशने 'द फिल्मी चर्चा' या माध्यमाशी बोलताना स्पष्टीकरण दिले. नीलने सांगितले की, "त्या दिवशी रात्री साडेदहा-अकरा वाजता मी माझ्या वडिलांशी बोलत होतो, जे अनुष्काच्या जवळच बसले होते. मी वडिलांना विचारले की, त्यांनी जेवण केले आहे का? वडिलांनी नाही सांगितल्यावर मी त्यांच्यासाठी जेवण आणायला निघालो. तेव्हाच अनुष्का समोर आली. मी तिलाही विचारले, 'तू जेवलीस का?' तिने नाही सांगितल्यावर मी तिला सांगितले, 'मग आधी जेव.'"
नील पुढे म्हणाले, "मी तिला रागावून नाही, तर काळजीने विचारले होते. पण त्या क्षणाचा चुकीचा अर्थ काढून लोकांनी मला असंवेदनशील ठरवलं. हे पाहून मला वाईट वाटले की, लोकांनी खरं काय आहे ते जाणून न घेता मला नावं ठेवली." या प्रकरणावर अनुष्का सेनने अद्याप कोणतेही वक्तव्य दिलेले नाही. नीलच्या या स्पष्टीकरणानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्याचे समर्थन केले आहे. नीलच्या वेबसीरिजची चांगलीच चर्चा आहे.