Join us

नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 15:10 IST

नाना पाटेकर यांनी पुन्हा एकदा जिंकली मनं!

Nana Patekar's  Aid Rajouri And Poonch 117 Families: अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या अभिनयासाठी जितके प्रसिद्ध आहेत, तितकेच ते त्यांच्या सामाजिक कार्यासाठीही ओळखले जातात. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आजही आपल्या अभिनयाची छाप सोडणारे नाना पाटेकर हे त्यांच्या 'निर्मला गजानन फाउंडेशन' या संस्थेद्वारे गरजू लोकांना मदत करत असतात. नुकतेच त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी आणि पुंछ जिल्ह्यातील 'ऑपरेशन सिंदूर'नंतरपाकिस्तानच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना मदत केली. नाना पाटेकर यांनी स्वतः त्या भागाला भेट देऊन पीडित कुटुंबांची चौकशी केली 

नाना पाटेकर यांनी भारतीय सैन्य आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने राजौरी आणि पुंछ जिल्ह्यातील ११७ कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी  ४२ लाख रुपयांची मदत दिली. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर झालेल्या सीमेपलीकडील गोळीबारामुळे या कुटुंबांना मोठा फटका बसला होता. नाना पाटेकर यांनी मे महिन्यात झालेल्या गोळीबारात आपले वडील गमावलेल्या एका ११ वर्षांच्या मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याचे जाहीर केले.

तिच्याबद्दल बोलताना नाना भावुक झाले, ते म्हणाले, "मुलीला म्हटलं की तुझे वडील तर वापस आणू शकत नाही, पण, तुझे नाना (आजोबा) जिवंत आहेत, असं समजं. तुझ्या शिक्षणाची जबाबदारी माझी". पुढे नाना पाटेकर म्हणाले, "हे आमचं छोटंसं योगदान आहे, जे आपल्या स्वतःच्या लोकांसाठी आहे. केवळ सीमेजवळ राहतात म्हणून त्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे. आम्ही त्यांना हे सांगू इच्छितो की ते एकटे नाहीत".

माध्यमांशी बोलताना नाना पाटेकर म्हणाले, "या कुटुंबांना मदत करणं ही माझी जबाबदारी आहे. अशा दुर्दैवी घटनांच्या काळात गरजू लोकांना मदत करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ते आपले भाऊ-बहिणी आहेत. हे आपलं सामूहिक कर्तव्य आहे. आम्ही कोणावर उपकार केलेले नाहीत, ही गोष्ट प्रत्येकाने करायला हवी".

यावेळी नाना पाटेकर यांनी अभिनेता–विनोदवीर जॉनी लिव्हरच्या समाजकार्यातील योगदानाचं कौतुक केले. तसेच लोकांना आवाहन करताना म्हणाले की, "सरकारवर अवलंबून न राहता समाजाच्या आणि नागरिकांच्या भल्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार लोकांसाठी बरेच काही करतात पण पुढे येत नाहीत. जॉनी लिव्हर त्यापैकी एक आहेत. आपणच जर नाही केले तर मग कोण करणार? सरकारने खूप काही केलं आहे, पण आपण स्वतःही काहीतरी करायला हवं. मी जर कोणाच्या आनंदाचा कारण बनलो, तर मला समाधान मिळतं".

'निर्मला गजानन फाउंडेशन' हे नाना पाटेकर यांच्या आई–वडिलांच्या नावावर आधारित असून, ते संपूर्ण भारतभर शिक्षण आणि आरोग्य उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. या फाउंडेशनने भारतीय सैन्यासोबत भागीदारी करून जम्मू, काश्मीर आणि लडाखमधील ४५ आर्मी गुडविल शाळा दत्तक घेतल्या आहेत. या सर्व उपक्रमांद्वारे नाना पाटेकर आणि त्यांची संस्था गरजू समुदायांना उभारी देण्याचं आणि समाजात दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवण्याचं काम सातत्याने करत आहे.

टॅग्स :नाना पाटेकरपाकिस्तानऑपरेशन सिंदूरसीमारेषा