Madhuri Dixit Husband Shriram Nene : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिने आपल्या दिलखेचक अदांनी ९०चं दशक तुफान गाजवलं. लग्नानंतर अभिनेत्री मनोरंजन विश्वापासून काहीशी दूर झाली आणि आपल्या संसारात रमली. मात्र, तिची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. आजकाल ती काही निवडक चित्रपटांमध्ये झळकत असली तरी, तिचं प्रसिद्धी वलय टिकून आहे. आजही माधुरी दीक्षितवर चाहते भरभरून प्रेम करतात.
चित्रपट कारकीर्द यशाच्या शिखरावर असताना १९९९मध्ये माधुरीने अमेरिकास्थित डॉ. श्रीराम नेने यांची लग्न करून सगळ्यांनाच मोठा धक्का दिला. लग्नांनंतर माधुरी परेशात स्थायिक झाली होती. मात्र, आता ती भारतात परतली आहे. या सगळ्या प्रवासात पती डॉ. श्रीराम नेने यांनी माधुरीला साथ दिली. मात्र, आता डॉ. नेने यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. कधी कधी लोक मला माझ्या पत्नीपेक्षा कमी दर्जाचे समजतात, असे त्यांनी म्हटले आहे.
लोकप्रियतेबाबत काय म्हणाले डॉ. नेने? माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी त्यांना मिळत असलेल्या सेलिब्रिटी वागणुकीवर आपले मत व्यक्त केले. आपल्या पत्नीला म्हणजे माधुरीला चित्रपटात पुनरागम करण्यात मदत करण्यासाठी आणि तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी डॉ. श्रीराम नेने देखील काही वर्षांपूर्वी भारतात परतले. “मला मिळत असलेली ही प्रसिद्धी आणि लोकप्रियता मी चांगल्या कामांसाठी वापरेन. कारण ही लोकप्रियता एक मोठी शक्ती आहे, असे मला वाटते’, असं मत डॉ. नेने यांनी व्यक्त केलं.
डॉ. दीपक चोप्रा यांच्यासोबत झालेल्या एका पॅनल चर्चेदरम्यान डॉ. नेने म्हणाले की, ''माझी पत्नी खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. मी तर इथे फक्त फिरायला आलो आहे. पण, या लोकप्रियतेच्या सिंड्रोमचा ज्याप्रकारे सामना करावा लागतो, त्यापेक्षाही अधिक यात लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची शक्ती आहे. आपल्यात सगळेच जण खूप शक्तिशाली आहेत, कुणालाही कमी लेखू नका.''
भारतात आल्यावर मी सेलिब्रिटी झालो!भारतात आल्यावर आपण देखील कसे सेलिब्रिटी झालो, यावर देखील त्यांनी भाष्य केलं. डॉ. नेने म्हणाले की, “इथे प्रत्येकाला माझ्यासोबत सेल्फी काढायचा आहे. मी या सगळ्यांना कसं हाताळू? खरं सांगू तर, मला या सगळ्यांशी खूप गप्पा मारायच्या असतात. पण, ते नेहमी कठीण होऊन जातं.”
अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने ७ ऑक्टोबर १९९९ रोजी अमेरिकेत राहणाऱ्या डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्नगाठ बांधली. डॉ. श्रीराम नेने हे कार्डियोव्हॅस्कुलर सर्जन अर्थात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. दोघांचे लग्न ठरवून जुळवण्यात आले होते. दोघांची पहिली भेट माधुरीच्या भावाने घडवून आणली होती.