Join us

'तो मला आईच म्हणायचा', सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत भावूक झाल्या 'आऊ' उर्फ उषा नाडकर्णी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 15:25 IST

सुशांतच्या आत्महत्येचे वृत्त ऐकल्यावर उषा नाडकर्णी थरथर कापू लागल्या. त्या म्हणाल्या, खूप चांगला मुलगा होता.

सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यात त्याची लोकप्रिय ठरलेली मालिका पवित्र रिश्तामधील कलाकारांना देखील खूप भावूक झाले आहेत. त्यात या मालिकेतील आऊ म्हणजेच अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनादेखील मोठा धक्का बसला आहे. 

उषा नाडकर्णी यांनी सांगितले की,  'माझ्या हेअरड्रेसरने मला फोन करून सुशांतने आत्महत्या केल्याचे सांगितले. सुरुवातीला खरे वाटले नाही. मीच तिला ओरडले आणि म्हणाले असे काही बोलू नकोस.' यावर ती म्हणाली आई खरंय ते आपल्याच सुशांतसिंह राजपूतबद्दल बोलत आहेत. तिच्या वाक्यावर मला काय बोलावं सुचलंच नाही. मी थरथर कापू लागले. तो फार चांगला मुलगा होता. आम्ही जवळपास दोन ते अडीच वर्ष एकमेकांसोबत काम केले होते.'

त्यांनी पुढे सांगितले की, पवित्र रिश्ता'च्या सेटवर तो नेहमीच हसत खेळत रहायचा. पण तो लाजाळूही होता. सेटवर मीच जास्त मस्ती करायचे पण तो नेहमी मान ठेवून वागायचा. एका सीनमध्ये मी माझ्या ऑनस्क्रिन मुलीला सीन कसा करायचा ते सांगत होते तेव्हा तो स्वतः पुढे येऊन म्हणाला की, आई तुला काहीतरी शिकवत आहे. तिच्याकडून शिक. हे २०२० वर्ष फारच वाईट आहे. या वर्षात अनेक चांगले कलाकार आपल्याला सोडून गेले.'

सेटवर सगळेच मला आई हाक मारायचे. सुशांतही मला आईच बोलायचा. पवित्र रिश्ता शो सुरू झाला तेव्हा तो फक्त २३ वर्षांचा होता. आज जेव्हा मी त्याचे फोटो टीव्हीवर पाहते माझे काळीज तुटते. सुशांतला जे हवे होते ते त्याने स्वबळावर मिळवले होते. चांगले सिनेमे, घर सगळे त्याने कमावले होते. पवित्र रिश्ता मालिकेच्या वेळी त्याने सांगितले होते की लवकरच तो २ कोटींचे घर घेणार आहे. तसेच भविष्यात त्याला कोणती गाडी घ्यायची आहे याबद्दलही त्याने सांगितले होते, असे उषा नाडकर्णी सांगत होत्या. 

सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर सुशांतला काय झालं काय माहित. इंडस्ट्रीत 365 दिवस काम मिळत नाही. माझ्या मुलालाही तेच सांगते की काम मिळाले नाही म्हणून डिप्रेशनमध्ये जायचे नाही. जेवढे आपल्या नशिबात आहे तेवढेच आणि त्याचवेळी मिळते. कोणतीही गोष्ट आधी किंवा नंतर मिळत नाही. त्यावेळी सुशांतसोबत घरातले मोठी व्यक्ती असायला हवी होती, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतउषा नाडकर्णी