‘बिग बी’सोबत काम करणे हे माझे सौभाग्य : मनोज वाजपेयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 21:39 IST
आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान कायम करणारा अभिनेता मनोज वाजपेयी याने अमिताभ बच्चन यांचे आभार व्यक्त केले. बॉलिवूडचे ...
‘बिग बी’सोबत काम करणे हे माझे सौभाग्य : मनोज वाजपेयी
आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान कायम करणारा अभिनेता मनोज वाजपेयी याने अमिताभ बच्चन यांचे आभार व्यक्त केले. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणे हे माझे सौभाग्य असल्याचे त्याने सांगितले. अमिताभ व मनोज वाजपेयी रामगोपाल वर्मा दिग्दर्शित आगामी ‘सरकार 3’मध्ये एकत्र दिसणार आहेत. मंगळवारी रात्री अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून ‘मनोज वाजपेयी महान अभिनेता आहे’ असे सांगितले होते. यावर मनोजने आज आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना त्याचे आभार मानले आहेत. यापूर्वी मनोज वाजपेयी याने अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘अक्स’, ‘आरक्षण’, ‘सत्याग्रह’ या चित्रपटांत काम केले आहे. मनोज ‘बिग बीं’चे आभार व्यक्त करताना म्हणाला, ‘अमिताभ बच्चन सर तुमच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. तुमच्यासोबत हा माझा चौथा चित्रपट आहे. तुमच्यासोबत काम करताना शिस्त कशी असावी हे जाणून घेण्याची आणखी एक संधी मला मिळाली. धन्यवाद’. अमिताभ यांनी केलेल्या ट्विट सोबत ‘सरकार 3’च्या सेटवरील मनोज वाजपेयी सोबतचा एक फोटो शेअर केला होता. अमिताभ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करताना, ‘सरकार 3 हा वेगळ्या थाटनीचा चित्रपट आहे. त्याला आता सांगता येणे कठीण आहे, ड्रामा, गांर्भिय आणि उत्तेजना आणि महान मनोज वाजपेयी’ असे लिहले होते. ‘सरकार 3’ हा रामगोपाल वर्मा यांच्या 2005 साली प्रदर्शित झालेल्या ‘सरकार’ या चित्रपटाचा तिसरा भाग आहे. यापूर्वीच्या भागांत अमिताभ बच्चन यांची भूमिका केंद्रस्थानी होती. यावेळी देखील ती कायम असणार आहे. भारतीय राजकारणावर आधारित असलेला हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून यात मनोज वाजपेयी साकारत असलेली गोविंद देशपांडे ही भूमिका अरविंद केजरीवाल यांच्याशी साम्य असणारी असल्याचे मनोजने सांगितले होते. ‘सरकार 3’मध्ये अमिताभ बच्चन सुभाष नागरे या भूमिकेत आहे. यासोबतच यात यामी गौतम, जॅकी श्रॉफ, रोहिणी हट्टंगडी, रोनित रॉय यांच्या भूमिका आहेत. }}}}