बॉलीवूड अभिनेत्री आणि राज्यसभा सदस्य जया बच्चन या अनेकदा सार्वजनिक ठिकाणी लोकांवर रागावताना दिसतात. जया बच्चन यांच्या रागाचा अनेकांना सामना करावा लागतो. अलीकडे पुन्हा एकदा जया बच्चन त्यांच्या स्पष्ट आणि ठाम वागण्यामुळे चर्चेत आल्या आहेत. दिल्लीतील ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब’मध्ये घडलेल्या एका प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यामध्ये सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला जया यांनी जोरात ढकलल्याचं दिसतं.
जया बच्चन यांचा व्हिडीओ व्हायरल
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं की, जया बच्चन एका कार्यक्रमासाठी कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आल्या होत्या. तेव्हा एक तरुण त्यांच्याजवळ येऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करू लागला. जया बच्चन यांचं लक्ष नव्हतं. अचानक त्यांची नजर बाजूला उभ्या असलेल्या त्या व्यक्तीकडे गेली आणि त्यांना चांगलाच राग आला. “क्या कर रहे हैं आप?” असं म्हणत जया बच्चन यांनी त्या व्यक्तीला जोरात बाजूला ढकललं. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. पुढे जया त्या व्यक्तीला सर्वांसमोर ओरडताना दिसल्या.
काही जणांनी जया बच्चन यांचं समर्थन केलं आणि म्हटलं की, अभिनेत्रीच्या परवानगीशिवाय अनपेक्षितपणे फोटो किंवा सेल्फी घेणं योग्य नाही. तर काहींनी मात्र जया यांच्यावर टीका केली आणि म्हटलं की, सेलिब्रिटी असणाऱ्या व्यक्तींनी अशा प्रसंगांना संयमाने सामोरं जावं.
जया बच्चन या यापूर्वीही त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे आणि थेट प्रतिक्रियांमुळे चर्चेत राहिल्या आहेत. संसदेत असो किंवा सार्वजनिक कार्यक्रमात, त्या कोणत्याही गोष्टीवर आपली भूमिका ठामपणे मांडतात. काही वेळा त्यांच्या प्रतिक्रियांवरून सोशल मीडियावर मीम्सदेखील बनवले जातात. जया बच्चन यांचा हा नवीन व्हिडीओ समोर आल्यावर अनेकांनी पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या वागण्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय.