- डॉ. खुशालचंद बाहेती जयपूर - बॉलिवूड कलाकारांच्या जाहिरातीला भुलून विकत घेतलेली कार खराब व धोकादायक निघाल्याच्या तक्रारीवरून शाहरुख खान आणि दीपिका पदुकोन यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यातील वकील कीर्ती सिंग यांनी २०२२ मध्ये गुंदाई अल्काझार एसयूव्ही खरेदी केली होती; परंतु खरेदीनंतर अल्पावधीतच वाहनामध्ये गंभीर तांत्रिक दोष दिसून आले. वाहनाच्या इंजिनची गती वाढते; पण वाहनाची गती वाढत नाही, इंजिन मॅनेजमेंट सिस्टममध्ये बिघाड होतो आणि वारंवार वाहन बंद पडते, असे त्यांनी कंपनीला कळविले. कंपनीकडे वारंवार संपर्क साधूनही दुरुस्ती न झाल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. या नादुरुस्तीमुळे त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचा त्यांचा आरोप आहे.
न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला की. दोषपूर्ण वाहन विक्री करून कंपनीने फसवणूक व विश्वासघात केला, तसेच कंपनी अधिकारी व ब्रँड अॅम्बेसिडर यांनी मिळून फौजदारी कट रचल्याचे सांगण्यात आले. जाहिरातींमधील माहिती भ्रामक असल्याने हे कृत्य ग्राहक संरक्षण अधिनियम, २०१९ अंतर्गत गुन्हा ठरतो, असेही मांडण्यात आले. सुप्रीम कोर्टाने २०२४ च्या निकालात जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटी जबाबदार ठरतात, असा स्पष्ट आदेश दिला होता, याचा दाखला फिर्यादीने दिला.
भरतपूर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर माथुरा गेट पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता ३१८ (फसवणूक), ३१६ (विश्वासघात) चा गुन्हा दाखल करण्यात आला. यात गुंदाई मोटार्स इंडिया लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक व विक्री एजन्सी यांनाही आरोपी करण्यात आले आहे.