Join us
Daily Top 2Weekly Top 5

#MeToo हिमानी शिवपुरी यांनी आलोकनाथ यांच्यावर केला हा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 16:03 IST

हिमानी शिवपुरी यांनी आलोक नाथ यांच्यासोबत परदेस आणि हम आपके है कौन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी आलोकनाथ दारूच्या नशेत त्यांच्या खोलीत आले होते असे म्हटले आहे.

टीव्ही आणि बॉलिवूडच्या जगात ‘संस्कारी बाबू’ अशी प्रतिमा असलेले अभिनेते आलोकनाथ यांच्यावर ‘तारा’ या गाजलेल्या मालिकेच्या निर्मात्या आणि लेखिका विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला आहे. मद्यात काहीतरी मिसळून आलोकनाथ यांनी आपल्यावर बलात्कार केला होता, असा विनता नंदा यांचा आरोप आहे. या वादानंतर याच मालिकेत काम करणाऱ्या नवनीत निशानने देखील आलोक नाथ यांच्या वागण्याला कंटाळून मी त्यांच्या कानफटात लगावली होती असे नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे. हम साथ साथ है चित्रपटातील महिला सदस्यासमोरच आलोकनाथ यांनी कपडे काढले असल्याचे या महिला क्रू मेंबरने देखील एका मुलाखतीत सांगितले आहे. यानंतर आता संध्या मृदुलने आलोकनाथ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आता अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी देखील आलोक नाथ दारूच्या नशेत त्यांच्या खोलीत आले होते असे म्हटले आहे. 

हिमानी शिवपुरी यांनी आलोक नाथ यांच्यासोबत परदेस आणि हम आपके है कौन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी नुकत्याच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते माझ्या खोलीत आले होते. त्यांनी प्रचंड दारू प्यायली होती. मी त्यांना पाहून प्रचंड घाबरले होते. ते मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. तसेच मी दारू प्यायलीच नाही असे मला भासवत होते. पण त्यांचा अवतार पाहून मी त्यांना खोलीच्या बाहेर जाण्यास सांगितले. पण ते काही केल्या माझे ऐकत नव्हते आणि त्यामुळे मी आरडाओरडा केला. माझ्या आवाजने सगळेजण जमले. त्यांना पाहाताच आलोकनाथ निघून गेले. हा प्रसंग मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. 

हम आपके है कौन या चित्रपटातदेखील हिमानी यांनी आलोकनाथ यांच्यासोबत काम केले होते. त्या सांगतात, मला आलेल्या या वाईट अनुभवामुळे हम आपके है कौन या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी देखील मी खूप घाबरले होते. संध्याकाळी दारू प्यायल्यानंतर त्यांचे एक वेगळेच रूप पाहायला मिळते हे मला माहीत होते. त्यामुळे मी संध्याकाळी एकटी राहाणार नाही याची चित्रीकरणाच्यावेळी आवर्जून काळजी घेत असे.

टॅग्स :आलोकनाथमीटू