'बिग बॉस' फेम अभिनेत्री मन्नारा चोप्राचे वडील रमन राय हांडा यांचे १६ जून २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने चोप्रा कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रमन हांडा काही काळापासून आजारी होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र, याच दरम्यान त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.
रमन हांडा यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी चोप्रा कुटुंबीय पोहोचले होते. त्यांना शेवटचा निरोप देताना मन्नारा चोप्रा आणि तिच्या बहिणीला अश्रू अनावर झाले. मन्नाराची रडून रडून वाईट अवस्था झाली होती. कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक तिला धीर देत होते. मात्र वडिलांचं छत्र हरपल्याने अभिनेत्री धाय मोकलून रडत होती. रमन हांडा यांच्या अंत्यसंस्कारावेळचे मन्नारा चोप्राचे काही भावुक करणारे व्हिडीओ समोर आले आहेत.
मन्नारा चोप्राचे वडील रमन हांडा हे प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्राचे काका होते. रमन राय हांडा हे प्रियांका चोप्राच्या आत्याचे पती होते. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रमन राय हांडा एक प्रसिद्ध वकील होते आणि दिल्ली उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत होते. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते.