Join us

महेश मांजरेकर दिग्दर्शित “स्वातंत्र्यवीर सावरकर” यांचा जीवनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 16:40 IST

या सिनेमाच्या माध्यमातून सावरकरांनी या देशासाठी दिलेले योगदान मांडण्याचा हा माझा छोटा प्रयत्न आहे", अशी प्रतिक्रिया महेश मांजरेकर यांनी दिली.

थोर स्वातंत्र्यसेनानी, प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवन संघर्षावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. सावरकरांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त या सिनेमाची घोषणा करण्यात आली. दिग्दर्शनाबरोबरच महेश मांजरेकर ऋषि विरमणी यांच्यासह सिनेमाच्या कथेचे लेखन देखील करणार आहेत. 

निर्माते संदीप सिंह आणि अमित वाधवानी सिनेमाची निर्मिती करणार आहेत. सिनेमाचे संगीत हितेश मोदक आणि श्रेयस पुराणिक करतील. महत्त्वाचे म्हणजे सिनेमाचे चित्रीकरण लंडन, अंदमान, आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी केले जाणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यानंतर सावरकर प्रेमी बरेच उत्सुक झाले असून सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

संदीप सिंह यांनी याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकची देखील निर्मिती केली होती. "सावरकरांचे जीवन हे खूप संघर्षमय आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व नेहमीच मला प्रोत्साहित करते. या देशाच्या तरुणांना सावरकरांचे विचार प्रेरणा देणारे आहेत. या सिनेमाचा भाग होण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो" अशी प्रतिक्रिया सिनेमाचे निर्माते अमित वाधवानी यांनी दिली.

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे आणि प्रसिद्ध तसंच लोकप्रिय नाव म्हणजे महेश मांजरेकर. एक अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून महेश मांजरेकर सुपरहिट ठरले आहेत. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही महेश मांजरेकर यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.या सिनेमाविषयी बोलताना या महेश मांजरेकर यांनी सांगितले की, चित्रपटाचे दिग्दर्शन करणे नक्कीच एक मोठं आव्हान असेल आणि मी ते स्वीकारण्यास तयार आहे. तसेच "स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवन संघर्ष नेहमीच मला प्रभावित करत आला आहे. माझे असे स्पष्ट मत आहे कि, सावरकरांना देशाच्या इतिहासात जे स्थान मिळायला हवे होत ते मिळाले नाही. या सिनेमाच्या माध्यमातून सावरकरांनी या देशासाठी दिलेले योगदान मांडण्याचा हा माझा छोटा प्रयत्न आहे", अशी प्रतिक्रिया महेश मांजरेकर यांनी दिली.

टॅग्स :महेश मांजरेकर