मोनालिसा भोसले (Mahakumbh Viral Girl Monalisa Bhosle) हिने तिच्या सुंदर डोळ्यांनी महाकुंभमेळ्यात सर्वांना मंत्रमुग्ध केले होते. त्यानंतर तिचं नशीब बदललं आणि तिने सिनेइंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलं. आता ती लवकरच दोन मोठ्या अभिनेत्यांसोबत काम करणार आहे. या वर्षीच्या महाकुंभमेळ्यात मोनालिसा माळा विकण्यासाठी आली होती, पण तिचे सुंदर डोळे पाहून सर्वजण तिच्या प्रेमात पडले. यावेळी तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यामुळे ती रातोरात प्रसिद्ध झाली.
आता लोक तिला 'व्हायरल कुंभ गर्ल' म्हणूनही ओळखतात. त्यानंतर मोनालिसाचे नशीब चमकले. या प्रसिद्धीमुळे चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी तिला त्यांच्या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून घेतले, ज्यामुळे तिची लोकप्रियता आणखी वाढली. १६ वर्षांची मोनालिसा लवकरच सनोज मिश्रा यांच्या 'द डायरी ऑफ मणिपूर' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजकुमार रावचा भाऊ अमित रावसोबत काम करणार आहे. या घोषणेनेच चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली आहे.
याशिवाय, ती मल्याळम चित्रपटसृष्टीतही पदार्पण करणार आहे. 'नागम्मा' नावाच्या या चित्रपटात ती दक्षिण चित्रपटसृष्टीतील अभिनेता कैलाशसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बिनू वर्गीस करत आहेत. मोनालिसा भोसले हिचे नशीब फळफळले आहे आणि चाहतेही तिला यशाच्या शिखरावर जाताना पाहून खूप आनंदी आहेत. आता सर्वजण तिच्या या पहिल्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.