Join us

‘मॅडम तुसाद’मधील बॉलिवूड ब्रिगेडमध्ये जुन्या जमान्यातील मधुबालाचाही समावेश!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 16:18 IST

एकेकाळी बॉलिवूडवर निर्विवाद वर्चस्व गाजविणारी अभिनेत्री मधुबाला हिचा प्रेक्षकांवरील प्रभाव आजही कायम आहे. शिवाय बॉलिवूडवरील कलाकारांवरही मधुबालाचा प्रभाव प्रकर्षाने ...

एकेकाळी बॉलिवूडवर निर्विवाद वर्चस्व गाजविणारी अभिनेत्री मधुबाला हिचा प्रेक्षकांवरील प्रभाव आजही कायम आहे. शिवाय बॉलिवूडवरील कलाकारांवरही मधुबालाचा प्रभाव प्रकर्षाने दिसतो. त्यामुळेच की काय मॅडम तुसादमधील बॉलिवूड ब्रिगेडमध्ये आता मधुबालाचेही नाव जोडले गेले आहे. दिल्ली येथे असलेले मॅडम तुसाद यावर्षाच्या अखेरपर्यंत सुरू केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मधुबालाचा मेणाचा पुतळा हा ‘मुगले आजम’मधील गाजलेल्या अनारकली या भूमिकेवर आधारित असेल. मधुबाला हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळातील एक प्रमुख अभिनेत्री राहिली आहे. ‘चलती का नाम गाडी’, ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेज-५५’, ‘काला पानी’ आणि ‘हावडा ब्रिज’सारख्या चित्रपटांमध्ये मधुबालाने काम केले आहे. यासर्व चित्रपटांमध्ये मधुबालाची भूमिका प्रचंड गाजल्याने हिंदी चित्रपटसृष्टीत मधुबालाचे नाव सन्मानाने घेतले जाते. मर्लिन एंटरटेनमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे महाप्रबंधक तथा दिग्दर्शक अंशुल जैनने म्हटले की, ‘दिल्ली स्थित मॅडम तुसादमध्ये मधुबालाचा पुतळा उभारला जात असल्याने आम्हाला आनंद होत आहे. कारण मधुबाला आजही देशातील करोडो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहे. अंशुल जैन यांनी पुढे बोलताना म्हटले की, आम्हाला खात्री आहे की, मधुबालाचे सौंदर्य प्रेक्षकांना आकर्षित करणारे ठरेल. तिच्या पुतळ्याबरोबर सेल्फी अन् थोडासा वेळ व्यतित करण्यासाठी प्रेक्षकांना संधी मिळेल. शिवाय मधुबालाचा पुतळा बघून प्रेक्षकांना जुन्या जमान्यात घेऊन जाईल. १९५२ मध्ये प्रसिद्ध ‘थिएटर आटर््स’ या अमेरिकी साप्ताहिकात मधुबालाचा एक सुंदर फोटो प्रकाशित झाला होता. या फोटोने मधुबालाच्या सौंदर्याला वैश्विक मान्यता मिळवून दिली. मधुबालाच्या सन्मानार्थ भारतीय पोस्ट खात्याने २००८ मध्ये तिचे छायाचित्र असलेले एक पोस्ट तिकीट काढले होते. दिल्लीतील प्रसिद्ध रिगल बिल्डिंगमध्ये असलेल्या या संग्रहालयात बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांचे मेनाचे पुतळे बसविण्यात आलेले आहेत. त्यामध्ये अमिताभ बच्चन, शाहरूख खान, गायिका आशा भोसले, श्रेया घोषाल आदिंचा समावेश आहे.