Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘नव्या काळाशी जुळवून घ्यायला शिका’-राणा दग्गुबती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 18:03 IST

‘बाहुबली’ फेम अभिनेता राणा दग्गुबती हा एका वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या निमित्ताने आणि त्याच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीविषयी ‘सीएनएक्स ...

‘बाहुबली’ फेम अभिनेता राणा दग्गुबती हा एका वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या निमित्ताने आणि त्याच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीविषयी ‘सीएनएक्स मस्ती’च्या जान्हवी सामंत यांनी एका वेबसीरिजच्या लाँचिंगप्रसंगी मनमोकळया गप्पा मारल्या. ‘सोशल मीडिया ही काळाची गरज आहे. ती ओळखून नव्या जगाच्या नव्या द्वारांचा खुलेपणाने स्वीकार करायला हवा,’ असे मत राणाने मुलाखतीदरम्यान व्यक्त केले.  * तुझी नवी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काय वाटते वेबसीरिज या नव्या माध्यमाबद्दल?- वेबसीरिज हे माध्यम पूर्वीपासूनच खूप प्रभावी वाटते. चित्रपट, मालिका, वेबसीरिज ही सर्व माध्यमं केवळ प्रेक्षकांपर्यंत एक कथा पोहोचवण्यासाठी वापरली जातात. सध्या वेबसीरिजचे वारे वाहत असल्याने वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. विशेषत्वाने एक चांगला कंटेंट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हा एकमेव उद्देश निर्माते, दिग्दर्शक मंडळींचा असतो.* चित्रपट, मालिका, वेबसीरिज असे बरेच प्रकार आपण पाहतो. या प्रकारांमुळे खरंच कथानक सांगण्याच्या प्रक्रियेत काही फरक पडतो का?- होय, फरक तर पडतोच. कारण आता तुम्हाला जर चित्रपट बघायचा असेल तर तुम्ही चित्रपटगृहात जाऊन तिकीट खरेदी करता आणि तीन तास मस्तपैकी चित्रपटाचा आनंद उपभोगता. मात्र, वेबसीरिज किंवा मालिका यांचे तसे होत नाही. ते तुम्ही तुमच्या आॅफिसमध्ये बसून मोबाईलवर आॅनलाईनही पाहू शकता. फरक फक्त एवढाच आहे की, मोबाईलवर एपिसोड्स पाहत असताना तुम्हाला एखादा अर्जंट कॉल आला किंवा महत्त्वाचे काम आले तर तुम्ही एपिसोड पाहणे थांबवून तुमचे काम पूर्ण करता. त्यामुळे सोशल मीडिया, डिजिटलायझेशन यांचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही आहेत. म्हणून नव्या काळासोबत चालायला शिका, नव्या गोष्टींचा स्वीकार करा, एवढंच सांगेन.* सोशल मीडियाबद्दल तुझे वैयक्तिक मत काय?- सोशल मीडियामुळे जग जवळ आले आहे. फेसबुक, टिवटर, इन्स्टाग्राम यांच्यामुळे आपण एकमेकांसोबत कनेक्ट होत आहोत. आता माझेच पाहा ना, मी कित्येक दिवसांपासून वर्तमानपत्र वाचणे बंद केले आहे. ई पेपर चा उत्तम आॅप्शन असल्यामुळे प्रिंटेड वर्तमानपत्र वाचणे मी टाळतो. त्यामुळे मला असं वाटतं की, कोणत्याही गोष्टीला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह गोष्टी या असतातच. मग, सकारात्मक दृष्टीने विचार करून आपण निगेटिव्ह गोष्टींचा त्याग करून पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.* ‘बाहुबली’ चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. काय वाटते तू या चित्रपटाचा एक भाग होतास? - ‘बाहुबली’ हा चित्रपट एका लढवय्याच्या जीवनावर आधारित होता. चित्रपटाच्या निमित्ताने मला थोडंसं अ‍ॅडव्हेंचर करता आलं. एक अभिनेता म्हणून मला बरंच काही शिकायलाही मिळालं. एखादे कथानक जर प्रादेशिक पातळीवर आधारित नसेल तर ते सर्वांशी अभिप्रेत असतं. अभिनयामुळे मला संधी मिळत गेल्या. मी शिकत गेलो आणि माझ्यातल्या कलाकाराला शोधून काढलं. * एक अभिनेता म्हणून कोणत्या चांगल्या आणि वाईट गोष्टींना तू सामोरा गेला आहेस?-  चांगलं आणि वाईट असं काहीही नसतं. आपली दृष्टी कशी आहे, यावर सर्व काही अवलंबून असते. मी कायम पुढे जात राहतो. मागे वळून कधीही पाहत नाही. माझ्यामध्ये असलेल्या सकारात्मक दृष्टीमुळे मला मिळालेल्या संधीचे सोनेच करतो आहे.