Join us

दिलीप कुमार यांना राखी बांधत होत्या लता मंगेशकर, फोटो शेअर करून झाल्या भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 13:06 IST

लता मंगेशकर यांनी दिलीप कुमार यांच्या निधनानंतर ट्विटरवर त्यांच्यासोबतचे फोटो शेअर करत भावूक पोस्ट शेअर केली आहे.

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार दिलीप कुमार यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर सर्व कलाकार दुःख व्यक्त करत आहेत. ते ९८ वर्षांचे होते आणि मागील बऱ्याच काळापासून आजारी होते. त्यांच्यावर खार येथील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे लता मंगेशकर यांनी आपल्या भावाला हरपले आहे. त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबतचे फोटो शेअर करत भावूक पोस्ट शेअर केली आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर ट्रॅजेडी किंग म्हणजेच दिलीप कुमार यांना राखी बांधत होत्या. आज भावाच्या निधनाचे वृत्त समजताच लता मंगेशकर यांनी काही जुने फोटो शेअर करत दुःख व्यक्त केले. त्यांनी एकानंतर एक बरेच ट्विट केले आहे.

लता मंगेशकर यांनी पहिल्या ट्विटमध्ये लिहिले की, युसूफ भाई, आज आपल्या छोट्या बहिणीला सोडून गेले. युसूफ भाई, का गेलात, एका युगाचा अंत झाला. मला काहीच सूचत नाही. मी खूप दुःखी आहे. निःशब्द आहे. बऱ्याच गोष्टी आठवणी देऊन जातात.

युसूफ भाई, मागील कित्येक वर्षांपासून आजारी होते. कोणाला ओळखत नव्हते अशा काळात सायरा वहिनीने सर्व सोडून दिवस रात्र त्यांची सेवा केली. त्यांच्यासाठी दुसरे जीवन नव्हते. अशा स्त्रीला मी अभिवादन करते आणि युसूफ भाईंच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करते.

९८ वर्षीय दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांना त्यांचे चाहते आणि अनेक सेलिब्रेटी श्रद्धांजली देत आहे. किती तरी कलाकारांनी दिलीप कुमार यांचा अभिनय पाहून अभिनयाची बाराखडी गिरवली असेल. दिलीप कुमार फिल्मफेअरचा पुरस्कार मिळवणारे इंडस्ट्रीतील पहिले कलाकार होते. 

टॅग्स :लता मंगेशकरदिलीप कुमार