रश्मिका मंदान्ना ही अभिनेत्री सध्या साऊथसह बॉलिवूडमध्येही चर्चेत आहे. नुकतीच ती सलमान खानसोबत 'सिकंदर' चित्रपटात झळकली होती. आता रश्मिका तिच्या आगामी साऊथ चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. 'कुबेरा' या चित्रपटात रश्मिकासोबत सुपरस्टार धनुष आणि अॅक्शन किंग नागार्जुन हे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. अलीकडेच या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित करण्यात आला असून त्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढवली आहे.
'कुबेरा'चा टीझर प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असा टीझर आहे. टीझरमध्ये एकच गाणं वाजतंय, त्यात एकही संवाद नाही. संवाद नसतानाही प्रत्येक कलाकाराचा अभिनय दमदार दिसतोय. टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला असून चाहत्यांनी याला 'स्फोटक' म्हटलं आहे. एका युजरने लिहिलंय, 'धनुषचा अभिनय पुन्हा एकदा चकित करणारा आहे'. तर दुसऱ्याने म्हटलंय, 'हा चित्रपट काहीतरी वेगळं घेऊन येणार आहे, यात शंका नाही'.
रश्मिका मंदान्ना, धनुष आणि नागार्जुन स्टारर 'कुबेरा' हा बहुप्रतिक्षित चित्रपट २० जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदीमध्ये एकाच वेळी चित्रित केला गेला आहे. टीझर पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. शेखर कम्मुला दिग्दर्शित या चित्रपटाची चित्रपटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत.