Join us

कॅटरिना कैफ अजूनही रणबीर कपूरच्या प्रेमात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2017 22:00 IST

‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ब्रेकअप झालेले रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्यात याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान पॅचअप होताना दिसत ...

‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ब्रेकअप झालेले रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्यात याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान पॅचअप होताना दिसत आहे. सुरुवातीला प्रमोशनसाठी एकत्र येतील का नाही? अशी शंका निर्माण केली जात असताना, या दोघांनी ज्या धूमधडाक्यात प्रमोशन केले, त्यावरून त्यांच्यात अजूनही प्रेमसंबंध आहेत, असेच काहीसे दिसत आहे. कारण दोघांनी केवळ चित्रपटाचे प्रमोशनच केले नाही तर, त्यांच्यातील नातेसंबंधांवरही उघड उघड भाष्य केले आहे. कॅटरिनाने त्यांच्यातील नात्याविषयी स्पष्टीकरण देताना म्हटले की, पर्सनल लाइफमध्ये आम्ही जरी विभक्त झालो असलो तरी, व्यावसायिक जीवनात आमच्यात खूप चांगला ताळमेळ आहे. त्यामुळे आमची जोडी आगामी काळातही प्रेक्षकांना बघावयास मिळू शकते. कॅटचे हे वक्तव्य रणबीरबद्दल तिच्या मनात अजूनही प्रेम असल्याचे संकेत देणारे आहे. ब्रेकअपनंतर एकमेकांसोबत शूटिंग करण्यास नाक मुरडणाºया या कपलनी सर्व काही विसरून प्रमोशनचा धडाका लावला. सुरुवातीला शूटिंगवरून चर्चेत राहणारे हे कपल नंतर मात्र प्रमोशनमुळे चर्चेत आले. याचदरम्यान कॅटने पीटीआयशी बोलताना म्हटले की, ‘दोन व्यक्तींमध्ये काय होऊ शकते? याचा शोध तोच लावू शकतो, ज्याला दिव्यशक्ती आहे. त्यामुळे माझ्या मनात काय आहे, हे कोणालाच माहीत नाही. आम्ही प्रोफेशनल असून, चित्रपटाचा प्रचार करीत आहोत. कलाकार म्हणून आमच्यात आजही चांगला ताळमेळ आहे. आम्ही ज्या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्याचा अनुभव खूपच चांगला राहिला आहे. आता या चित्रपटाचीही प्रेक्षकांवर जादू व्हावी’. रणबीर आणि कॅटची जोडी यापूर्वी ‘राजनीती’ आणि ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटांमध्ये झळकली होती. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर चांगला गल्ला जमविला होता. प्रमोशनदरम्यान कॅटरिनाने स्पष्ट केले होते की, ‘जग्गा जासूस’नंतर ती रणबीरसोबत कुठलाच चित्रपट करणार नाही. मात्र जेव्हा रणबीरला या चित्रपटासाठी कॅटरिना कोणाची च्वाईस होती? असे विचारण्यात आले तेव्हा त्याने लगेचच ‘माझी पसंत होती’ असे उत्तर दिले. त्यानंतर कॅटनेही आपल्या वक्तव्यावर घूमजाव करीत मी रणबीरसोबत आगामी काळातही चित्रपट करणार असल्याचे म्हटले होते. तसेच माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावल्याचेही तिने सांगितले होते. दरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासू याने केले असून, चित्रपटाचा सहनिर्माता म्हणून रणबीर कपूरने काम पाहिले आहे. आतापर्यंत चित्रपटाचे ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांकडून प्रचंड पसंती मिळाली आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर धूम उडवून देईल, अशीच काहीशी चर्चा समीक्षकांमध्ये रंगत आहे.