करण जोहरचा (Karan Johar) महत्वाकांक्षी प्रोजेक्ट 'तख्त' (Takht) सिनेमाची काही काळापूर्वी घोषणा झाली होती. या सिनेमात रणवीर सिंह, आलिया भट, विकी कौशल, भूमी पेडणेकर, अनिल कपूर, जान्हवी कपूर यासह तगडी स्टारकास्ट असणार होती. सिनेमाची रिलीजपूर्वीच जोरदार चर्चा होती. मात्र नंतर सिनेमा थंडबस्त्यात गेला. याचं कारण शेवटपर्यंत समोर आलंच नाही. अभिनेता अक्षय ओबेरॉयचीही (Akshay Oberoi) या सिनेमासाठी निवड झाली होती. आता नुकतंच त्याने सिनेमावर प्रतिक्रिया दिली आहे.
न्यूज १८ शोशाला दिलेल्या मुलाखतीत अक्षय ओबेरॉय म्हणाला, "मला सिनेमात औरंगजेब आणि दारा शिकोहच्या तिसऱ्या भावाची मुराद बख्शची भूमिका ऑफर झाली होती. तेव्हा माझी करण जोहरसोबत भेटही झाली होती. सिनेमात निवड झाल्याचा माझा आनंद गगनात मावत होता. मी करण जोहरला भेटून तर खूप प्रभावित झालो होतो. या सिनेमासाठी मला ऑडिशनही द्यावी लागली नव्हती कारण त्याने माझं काम आधीच पाहिलं होतं. त्याला आवडलंही होतं. माझी लूक टेस्ट फक्त झाली होती."
तो पुढे म्हणाला, "एक दिवस मी घरी हॉलमध्ये टीव्ही पाहत असताना तख्त सिनेमा थंडबस्त्यात गेल्याची बातमी आली. याबद्दल मला काहीच सांगण्यात आलं नव्हतं. मला अक्षरश: माझं स्वप्न तुटल्यासारखं वाटलं. माझं मन आतून तुटलं होतं. मात्र कोरोना काळात अनेक मोठमोठे प्रोजेक्ट्स बंद पडले होते."
अक्षय ओबेरॉयचा जन्म अमेरिकेत झाला आहे. २००२ साली त्याने 'अमेरिकन चाय'मध्ये बालकलाकाराची भूमिका साकारली होती. तर २०१० साली आलेल्या 'इसी लाईफ मे' सिनेमातून त्याने मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केलं होतं. गेल्या वर्षी हृतिक रोशनच्या 'फायटर' सिनेमात दिसला.