दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खानचा (Babil Khan) काही दिवसांपूर्वी व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये तो अक्षरश: रडत होता. तसंच त्याने बॉलिवूड फेक असल्याचं सांगत अरिजीत सिंह, अनन्या पांडे, राघव जुयाल, सिद्धांत चतुर्वेदी या काही कलाकारांची नावं घेतली होती. नंतर त्याने व्हिडिओ डिलिट करत स्पष्टीकरणही दिलं होतं. दरम्यान बाबिलचा व्हिडिओ पाहून आपल्यालाही वाईट वाटल्याचं वक्तव्य नुकतंच करण जोहरने (Karan Johar) केलं आहे.
करण जोहरने नुकतीच 'गलाटा प्लस'ला मुलाखत दिली. यावेळी बाबिलच्या व्हिडिओवर तो म्हणाला, "जेव्हा मी बाबिलला रडताना पाहिलं तेव्हा मलाही तितकंच वाईट वाटलं जितकं इतरांना वाटलं होतं. त्या व्हिडिओमुळे मला धक्काच बसला कारण मी सुद्धा एका मुलाचा आणि मुलीचा बाप आहे. एक वडील म्हणून मला ते पाहून खूप वाईट वाटलं होतं."
बाबिल खानने व्हिडिओ शेअर करत शनाया कपूर, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, अर्जुन कपूर, आदर्श गुप्ता, राघव जुयाल या सेलिब्रिटींची नावं घेतली होती. मात्र त्याने वाक्य अर्धवट सोडलं होतं. तसंच बॉलिवूड फेक असल्याचं तो म्हणाला होता. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. नंतर त्याने अकाऊंटच डिअॅक्टिव्हेट केलं. बाबिलच्या सपोर्टसाठी अनेकांनी पोस्ट लिहिल्या. राघव, सिद्धांत, अनन्या या सेलिब्रिटींनी पोस्ट शेअर करत बाबिल किती चांगला मुलगा आहे हे दाखवलं. नंतर बाबिलच्या आईनेही स्पष्टीकरण देत सावरासावरी केली. ती सेलिब्रिटींची नावं त्यांचं कौतुक करण्यासाठी घेतली होती असं नंतर बाबिल म्हणाला होता.