करण जोहरचा (Karan Johar) ड्रीम प्रोजेक्ट 'तख्त' (Takht) सिनेमाची गेल्या काही वर्षांपूर्वी खूप चर्चा होती. मात्र नंतर कोरोना, लॉकडाऊन यामुळे ही चर्चा थंड पडली. सिनेमात तगडी स्टारकास्ट असणार होती. करण स्वत: याचं दिग्दर्शन करणार होता. दरम्यान सिनेमाच्या चर्चा थंडावल्यानंतर आता पहिल्यांदाच करणने यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'तख्त' बनणार की डबाबंद होणार यावर करण पहिल्यांदाच बोलला आहे.
'गलाटा प्लस'ला दिलेल्या मुलाखतीत करण जोहरला 'तख्त'का बनू शकला नाही? असं विचारण्यात आलं. यावर तो म्हणाला, "सिनेमा बनू शकला नाही यामागे अनेक कारणं आहेत. पण माझ्याकडे अजूनही त्याची स्क्रिप्ट आहे. एक ना एक दिवस मी हा सिनेमा नक्की बनवेन. ही माझ्या आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट स्क्रिप्ट आहे. याचा स्क्रीनप्ले सर्वोत्तम आहे. त्यामुळे एक दिवस तख्त नक्की बनेल."
याआधी आलिया भटलाही 'तख्त' बद्दल विचारण्यात आलं होतं. 'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती की, "सध्या तरी हा सिनेमा बनत नाहीए. सिनेमाचं काम का सुरु होऊ शकलं नाही याची मलाही कल्पना नाही. सिनेमाची घोषणा केली आणि कोव्हिड आला. त्यामुळे करणने काम थांबवण्याचा निर्णय घेतला. त्याजागी दुसरा सिनेमा बनवण्यात आला आणि 'तख्त'चं काम थांबलं."
'तख्त' सिनेमा हा औरंगजेब आणि दारा शिकोह या दोन्ही भावांमध्ये सिंहासनावरुन झालेल्या वैरावर आधारित होता. दिल्लीच्या गादीवर ('तख्त'वर) बसण्यासाठी त्यांच्या स्पर्धा होती. या सिनेमात रणवीर सिंह, विकी कौशल, आलिया भट, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर यासह अनेक कलाकार असणार होते. मात्र कोरोनामुळे सिनेमाचं काम सुरुच होऊ शकलं नाही आणि करणने नंतर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' बनवला.