Join us

​अर्जुन कपूर, हृतिक रोशन नव्हे तर बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध अभिनेता साकारणार कपिल देव यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 10:55 IST

कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट बनवला जात असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटात हृतिक रोशन ...

कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट बनवला जात असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटात हृतिक रोशन अथवा अर्जुन कपूर कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात होते. या चित्रपटासाठी अर्जुन कपूरची निवड देखील झाली गेली असल्याची दोन-तीन दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे. पण अर्जुन किंवा हृतिक नव्हे तर एका दुसऱ्याच अभिनेत्याने बाजी मारली आहे. रणवीर सिंग आता कपिल देव यांची भूमिका साकारणार असून रणवीर पहिल्यांदाच प्रेक्षकांना एका क्रिकेटरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.कपिल देव यांच्या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अनेक अभिनेत्यांची नावे चर्चेत होती. त्यामुळे या सगळ्या अभिनेत्यांमध्ये कोणता अभिनेता बाजी मारणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करून ही बातमी सगळ्यांना सांगितली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, कबिर खान कपिल देव यांच्या आय़ुष्यावर आधारित एक चित्रपट बनवत असून रणवीर सिंग या चित्रपटात प्रेक्षकांना क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती फँटम फिल्मस आणि सेलिब्रिटी क्रिकेट लीगचे व्यवस्थापकीय अध्यक्ष विष्णू वर्धन इंदूरी मिळून करत आहेत. विष्णू वर्धन इंदूरी यांनी डेक्कन क्रोनिकल या वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले आहे की, गेल्या तीन-साडे तीन वर्षांपासून मी हा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करत आहे. रणवीर आणि कबिर ही अतिशय चांगली जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. १९८३ हे वर्षं क्रिकेट रसिकांसाठी सगळ्यात चांगले वर्षं होते असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण याच वर्षी आपल्याला पहिला वर्ल्ड कप मिळाला. वर्ल्ड कप जिंकल्याचा भारतीयांना झालेला आनंद हा शब्दांत व्यक्त केला जाऊ शकत नाही. कपिल देव आणि त्यांच्या टीमने लोकांना हा आनंद मिळवून दिला होता. वेस्ट इंडिजला हरवून कपिल देव यांनी आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला वर्ल्ड कप मिळवून दिला होता. कपिल देव यांनी एक क्रिकेटर म्हणून चांगलेच नाव मिळवले. त्यांच्या जिद्दीची कथा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.Also Read : रणवीर सिंहच्या ‘या’ गाण्याने रचला विक्रम!