बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचा (Kangana Ranaut) आवडता सिनेमा कोणता असं विचारलं तर अनेक जण 'तनू वेड्स मनू' हे नाव आवर्जुन घेतील. याचा दुसरा पार्टही आला होता. कंगना आणि आर माधवनची (R Madhavan) हटके जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली. आता प्रेक्षकांची हीच लाडकी जोडी पुन्हा एकत्र आली आहे. सध्या दोघांनीही आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. कंगनानेच सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही गुडन्यूज दिली आहे.
कंगना राणौतने सोशल मीडियावर सिनेमाच्या क्लॅपबोर्डचा फोटो शेअर करत लिहिले, "फिल्म सेटवर असण्याचा आनंद इतर कशाही पेक्षा मोठा आहे." याआधीही कंगनाने फिल्मच्या टीमसोबत बसलेली असताना फोटो शेअर केला होता. आता हा 'तनु वेड्स मनू'चा तिसरा पार्ट आहे की भलताच कोणता सिनेमा आहे हे अजून गुलदस्त्यातच आहे.
गेल्या वर्षीच कंगनाने सायकॉलॉजिकल थ्रिलर फिल्मची घोषणा केली होती. हा तोच सिनेमा असल्याचा चाहत्यांचा अंदाज आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन 'थलायवी'चे दिग्दर्शक विजय करत आहेत. चेन्नईमध्ये सिनेमाचं शूट सुरु आहे. कंगना आणि आर माधवन जोडीला पुन्हा स्क्रीनवर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
कंगनाचा नुकताच 'इमर्जन्सी' सिनेमाही रिलीज झाला. यामध्ये तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली. कंगनाच्या अभिनयाचं आणि सिनेमाचं प्रेक्षक कौतुक करत आहेत. खासदार झाल्यानंतरचा कंगनाचा हा पहिलाच सिनेमा आहे.