भाजपा सरकारच्या आगामी अर्थसंकल्पातून काजोलला आहेत ‘या’ अपेक्षा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 17:49 IST
अभिनेत्री काजोलच्या मते, मनोरंजन विश्व करमुक्त असायला हवे. गेल्या मंगळवारी मुंबईत हिंंदुस्तान युनिलीवरच्या ‘स्वच्छ आदत स्वच्छ भारत’ अभियानात काजोल ...
भाजपा सरकारच्या आगामी अर्थसंकल्पातून काजोलला आहेत ‘या’ अपेक्षा!
अभिनेत्री काजोलच्या मते, मनोरंजन विश्व करमुक्त असायला हवे. गेल्या मंगळवारी मुंबईत हिंंदुस्तान युनिलीवरच्या ‘स्वच्छ आदत स्वच्छ भारत’ अभियानात काजोल उपस्थित होती. काजोल या अभियानाची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. यावेळी तिला फेब्रुवारीत सादर करण्यात येत असलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी विचारले असता, तिने तिच्या अपेक्षा मांडल्या. काजोलने म्हटले की, ‘हा खूपच कठीण प्रश्न आहे. त्यामुळे यावर मी आताच बोलायला हवे की, नाही हे मला माहीत नाही. पण अशातही तुम्ही मला विचारले असता, मी मनोरंजन विश्व करमुक्त व्हावे, अशी अपेक्षा ठेवून आहे. परंतु भविष्यात हे होईल की नाही हे मला माहिती नसल्याने याबाबतचा निर्णय मी सरकारवर सोडू इच्छिते. सरकारने सॅनिटरी नॅपकिनवर १२ टक्के कर लावल्याविषयी काजोलला विचारले असता तिने म्हटले की, हे प्रशासनानेच निश्चित करायला हवे की, योग्य काय आहे. पुढे बोलताना काजोलने म्हटले की, महिलांच्या सॅनिटरी नॅपकिनबरोबरच दूध आणि तांदळावरही कर लावण्यात आला आहे. अशात मला असे वाटते की, काय योग्य आणि काय अयोग्य, हे सरकार जाणून आहे. काजोलने ‘व्हीआयपी-२’मधून मोठ्या पडद्यावर कमबॅक केले होते, आता ती पती अजय देवगणसोबत त्यांच्या होम प्रोडक्शन अंतर्गत निर्मित एका चित्रपटावर काम करीत आहे. दरम्यान, सध्या स्वच्छतेसंबंधी जनजागृती करण्यासाठी काजोल ‘स्वच्छ आदत स्वच्छ भारत’ या अभियानांतर्गत काम करीत आहे. या अभियानाची ती ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असून, देशभरात स्वच्छता या प्रमुख मुद्द्यावर काम करण्याचा तिचा मानस आहे. काजोलने गेल्या गुरुवारी लोकांना स्वच्छतादूत बनण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात योगदान देण्यासाठी आवाहन केले आहे.