Join us
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यासोबतच असे का? असे म्हणत दिवसरात्र रडायची जुही चावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 07:00 IST

मुलाखतीत करिअरवर बोलली जुही

ठळक मुद्देजुहीला जान्हवी आणि अर्जुन ही दोन मुले आहे. सोशल मीडियावर फार क्वचितच ती या दोघांचे फोटो पोस्ट करते.

जुही चावला ही बॉलिवूडची गुणी अभिनेत्री. मनमोहक हास्याने आणि अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकणा-या जुहीने एक काळ गाजवला. अर्थात यासाठी जुहीला खूप मोठा संघर्ष करावा लागला. करिअरमध्ये तिचे अनेक सिनेमे फ्लॉप झालेत. विश्वास बसणार नाही पण सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर जुही दिवसदिवस रडायची. चिडचिड करायची. आता आपले काय होईल, हा एक प्रश्न स्वत:ला विचारून निराश व्हायची.एका ताज्या मुलाखतीत खुद्द जुहीने याचा खुलासा केला.

‘चित्रपट चालला नाही की, मी दोन-दोन, तीन-तीन दिवस रडत राहायचे. अंथरूणावर नुसते पडून राहायचे. माझ्यासोबतच असे का? असा विचार करायची. माझे अश्रू पाहून तरी देवाला माझी दया येईल, असे मला वाटायचे. चित्रपट रिलीज झाला त्या पहिल्या आठवड्यात माझी प्रचंड चिडचिड व्हायची. आता माझ्या करिअरची वाट लागणार, असा विचार करत स्वत:ला छळायची,’ असे जुहीने या मुलाखतीत सांगितले.

अलीकडे जुहीने तिच्या मुलांबद्दल खुलासा केला होता. माझ्या मुलांना माझे सिनेमे पाहताना लाजीरवाणे वाटते. माझे जुने सिनेमे पाहण्यात त्यांना काहीही रस नाही. माझा कुठलाच जुना सिनेमा त्यांनी पाहिलेला नाही, असे तिने सांगितले होते.

जुहीला जान्हवी आणि अर्जुन ही दोन मुले आहे. सोशल मीडियावर फार क्वचितच ती या दोघांचे फोटो पोस्ट करते. या दोघांनाही प्रसारमाध्यमे आणि झगमगाटापासूनच दूर ठेवण्याचे तिने पसंत केले.  1995 साली जुहीने बिझनेसमॅन जय मेहतासोबत लग्न केले. अनेक वर्षे जुहीच्या लग्नाची भणकही कुणाला लागली नाही. तिने अगदी पद्धतशीरपणे हे लग्न जगापासून लपवून ठेवले होते. होय, एका  मुलाखतीत जुहीने लग्न लपवण्यामागच्या कारणांचा खुलासा केला होता. ती म्हणाली, ‘त्यावेळी इंटरनेट नव्हते. प्रत्येक फोनमध्ये कॅमेराही नव्हता. त्यामुळे माझे लग्न झालेय, हे लपवणे सहज शक्य झाले. लग्न झाले त्यादरम्यान मी यशाच्या शिखरावर होते. मला लग्नानंतरही काम करायचे होते. लग्नाचा खुलासा केला तर करिअर संपेल, अशी भीती मला होती. त्यामुळे मी शांत बसले आणि काम करत राहिले.’

टॅग्स :जुही चावला