जयंती विशेष : वाचा, विनोद मेहरा यांच्या आयुष्यातील एक गाजलेला ‘एपिसोड’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2017 12:10 IST
बॉलिवूडमध्ये ७० व ८० च्या दशकांत एका हिरोने वेगळीच ओळख निर्माण केली. त्या दशकातील ‘चॉकलेट हिरो’ म्हणून हा अभिनेता ...
जयंती विशेष : वाचा, विनोद मेहरा यांच्या आयुष्यातील एक गाजलेला ‘एपिसोड’!
बॉलिवूडमध्ये ७० व ८० च्या दशकांत एका हिरोने वेगळीच ओळख निर्माण केली. त्या दशकातील ‘चॉकलेट हिरो’ म्हणून हा अभिनेता ओळखला गेला. हा अभिनेता म्हणजे विनोद मेहरा. विनोद मेहरा आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे काही यादगार सिनेमे आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. १३ फेबु्रवारी १९४५ मध्ये जन्मलेल्या विनोद मेहरा यांची अभिनयाची कारकिर्द आणि व्यक्तिगत आयुष्य दोन्ही प्रचंड गाजले. अभिनेत्री रेखासोबतच्या गुपचूप लग्नाचा त्यांच्या आयुष्यातील एक एपिसोड तर मोठ्या चर्चेचा विषय ठरला. विनोद मेहरांच्या आयुष्यातील अशाच काही गोष्टींवर एक नजर... विनोद मेहरा यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. ‘रागिणी’ या चित्रपटात त्यांनी किशोर कुमार यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. याश्विाय ‘बेवकूफ’ आणि ‘अंगुलीमाल’ या चित्रपटातही ते बालकलाकार म्हणून दिसले होते. १९६५ मध्ये एका टॅलेंट हंट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्या पतीच्या आग्रहास्तव विनोद मेहरा यांनीही या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत राजेश खन्ना यांच्यासह सुमारे दहा हजार स्पर्धक होते. या स्पर्धेत विनोद मेहरा जवळपास फायनल विनर होते. मात्र ऐनवेळी विजेता म्हणून राजेश खन्ना यांचे नाव जाहिर झाले आणि ते सुपरस्टार बनले. विनोद मेहरा या स्पर्धेचे उपविजेते ठरले. चित्रपटात येण्यापूर्वी विनोद मेहरा मार्केटींग एक्झिक्युटीव्ह होते. एकेदिवशी निर्माता शौरी यांची नजर त्यांच्यावर गेली. त्यांनी आपल्या ‘एक थी रिता’ या चित्रपटासाठी विनोद मेहरा यांना आॅफर दिली. या चित्रपटात त्यांची हिरोईन होती,अभिनेत्री तनुजा. विनोद मेहरा यांच्या करिअरला गती देण्यात अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांचा मोठा हात आहे. ‘अनुराग’ या चित्रपटात मौसमी व विनोद यांची जोडी सर्वप्रथम पडद्यावर आली. अभिनेत्री रेखासोबतचा विनोद मेहरा यांचा रोमान्स त्यावेळी प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. दोघांची गुपचूप लग्न केल्याची चर्चा ही त्यावेळी होती. अर्थात रेखा वा विनोद मेहरा यांनी कधीच याची कबुली दिली नाही. रेखा जेव्हा कलकत्ता येथे विनोद मेहरा यांच्याशी लग्न करून सासरी आल्या त्यावेळी त्यांच्या सासूने त्यांना मारण्यासाठी चप्पल हातात घेतली होती. इतकेच नाही तर त्यांना घराबाहेरही हकलवून लावले होते. रेखा यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या तेथून नंतर निघून गेल्या. विनोद मात्र तिथेच आपल्या आईला समजवत राहिले. रेखासोबत विनोद मेहराचे हे तिसरे लग्न होते. पण, त्यांचे नाते जास्त दिवस टिकले नाही.यासिर उस्मान यांच्या ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे. विनोद निर्मिती क्षेत्रातही उतरले. ‘गुरुदेव’ या चित्रपटाद्वारे त्यांनी निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. यात ऋषीकपूर, अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अर्थात हा चित्रपट रिलीज होण्याआधीच विनोद मेहरा यांना हृदयविकाराचा धक्का आला. ३० आक्टोबर १९९० रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.