Join us

'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 12:40 IST

ज्युनिअर एनटीआरला का आला इतका राग? पाहा व्हिडीओ

हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआरचा (Jr NTR)आगामी 'वॉर २' (War 2)  सिनेमाची चर्चा आहे. सध्या दोघंही सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये ज्युनिअर एनटीआर स्टेजवर बोलत असताना अचानक एका चाहत्यावर त्याचा पारा चढला. तो त्या चाहत्याकडे बोट दाखवून रागारागात बोलतानाही दिसला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

दोन दिवसांपूर्वी ज्युनिअर एनटीआर एका इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. 'वॉर २'च्या प्रमोशनसाठी तो तिथे आला  होता. ब्लॅक शर्ट, पँट आणि जॅकेट अशा साध्याच लूकमध्ये तो दिसला. त्याला पाहण्यासाठी समोर चाहत्यांची मोठी गर्दी होती. तो स्टेजवरुन माईकवर चाहत्यांशी संवाद साधत होता. मात्र तेव्हाच चाहते जोरजोरात ओरडत होते. तेवढ्यात ज्यु.एनटीआर चिडला आमि रागारागात म्हणाला, 'भाई, मी निघून जाऊ का? जाऊ इथून? मी तुम्हाला काय म्हटलं? जेव्हा मी बोलतो तेव्हा शांतता राखा. मला माईक ठेवून स्टेज सोडून जायला एक सेकंदही लागणार नाही. मी बोलू? शांत बसा."

ज्युनिअर एनटीआरने रागात ताकीद दिल्यानंतर सर्व चाहते चिडीचूप बसले. यानंतर ज्यु. एनटीआरने वायआरएफ स्टुडिओजचे आभार मानले. त्यांनी मला अगदी घरी असल्यासारखं ठेवलं असंही तो म्हणाला. 'वॉर २'मधून ज्युनिअर एनटीआर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सिनेमा हृतिक रोशनसोबत त्याचे दमदार अॅक्शन सीन्स आहेत.अयान मुखर्जी दिग्दर्शित वॉर २' हा YRF च्या स्पाय युनिव्हर्स मधील एक महत्त्वाचा सिनेमा आहे.  'वॉर २' हा सिनेमा १४ ऑगस्ट रोजी हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये जगभरातल्या चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कियारा अडवाणी, आशुतोष राणा सुद्धा झळकत आहेत.

टॅग्स :ज्युनिअर एनटीआरवॉरबॉलिवूडव्हायरल व्हिडिओ