Join us
Daily Top 2Weekly Top 5

धारावीत एका छोट्याशा झोपडीमध्ये राहायचा जॉनी लिव्हर, अशी झाली बॉलिवूडमध्ये एंट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 20:08 IST

जॉनी लिव्हरची परिस्थिती अतिशय बेताची होती. तो धारावीतील एका छोट्याशा झोपडीमध्ये राहात होता.

ठळक मुद्देत्याने या मुलाखतीत सांगितले होते की, मी माझ्या घरातील सगळ्यात मोठा मुलगा होतो. माझ्या घरची परिस्थिती चांगली नसल्याने मला सातवीतच शाळा सोडावी लागली.

जॉनी लिव्हरने आज बॉलिवूडमध्ये त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. पण त्याच्यासाठी आजवरचा हा प्रवास सोपा नव्हता. जॉनीने इथवर पोहोचण्यासाठी प्रचंड स्ट्रगल केला आहे. जॉनी लिव्हरची परिस्थिती अतिशय बेताची होती. तो धारावीतील एका छोट्याशा झोपडीमध्ये राहात होता. त्याला नृत्याची आवड असल्याने तो त्याच्या परिसरात होणाऱ्या अनेक समारंभात भाग घ्यायचा. त्याच्या अंगात कला होती. पण त्याला वाव मिळत नव्हता. याविषयी जॉनी लिव्हरनेच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते.

त्याने या मुलाखतीत सांगितले होते की, मी माझ्या घरातील सगळ्यात मोठा मुलगा होतो. माझ्या घरची परिस्थिती चांगली नसल्याने मला सातवीतच शाळा सोडावी लागली. माझ्या वडिलांची कमाई खूप कमी असल्याने मी १२व्या वर्षापासून नोकरी करायला सुरुवात केली. मी सहा वर्षं एका कंपनीत काम केले. तिथे मला खूपच कमी पैसे मिळायचे. पण कुटुंबाला हातभार लागतोय असा विचार करून मी हे काम करत होतो. मी लहानपणापासूनच आजूबाजूच्या लोकांना पाहून मिमिक्री करत असे. त्यामुळे नोकरी करत असतानाच मी मिमिक्री शो देखील करायला लागलो. असाच एक शो करताना कल्याणजी-आनंदजी यांना भेटण्याची मला संधी मिळाली. त्यांना माझी मिमिक्री खूप आवडल्याने त्यांनी मला त्यांच्यासोबत शो करण्याची संधी दिली. त्यामुळे मी त्यांच्यासोबत परदेशातही शो करायला लागलो. १९८० पासून मी शो करत होतो. शो मध्ये लोकांना माझी मिमिक्री आवडत असली तरी मला चित्रपटात घ्यायला कोणी तयार नव्हते.

त्याच्या प्रवासाविषयी पुढे तो सांगतो, १९९२ मध्ये मला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला. मला मिळालेल्या संधीचे मी सोने केले आणि त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.

टॅग्स :जॉनी लिव्हर