Jamie Lever : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते, कॉमेडियन जॉनी लिव्हर (Johnny Lever) यांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. गेली कित्येक वर्ष आपल्या विनोदी कौशल्याच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत लेक जेमी लिव्हर (Jamie Lever) देखील कलाविश्वात तितकीच सक्रिय असल्याची पाहायला मिळते. जेमी लिव्हर इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. जेमी सोशल मीडियावरील तिच्या व्हिडिओंमधून नेहमी चाहत्यांचं मनोरंजन करत असते. अलिकडेच जेमीने दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील एक धक्कादायक प्रसंग शेअर केला आहे.
जेमीने नुकतीच 'हाउटरफ्लाई' ला मुलाखत दिली. यावेळी जेमीने तिच्या आयुष्यातील चांगल्या-वाईट अनुभवांवर भाष्य केलं. त्यादरम्यान, जेमीने तिच्यासोबत लहानपणी घडलेला एक प्रसंग सांगितला. त्यावेळी ती म्हणाली,"मी तेव्हा मुंबईतील विलेपार्ले येथील जमनाबाई नरसी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होते. एके दिवशी शाळा सुटल्यानंतर मी माझ्या मैत्रीणीसोबत गाडीच्या मागच्या सीटवर बसले होतो. त्यावेळी आमचा ड्रायव्हर देखील सोबत होता आणि तेव्हा आम्ही माझ्या भावाची वाट पाहत होते. त्यानंतर एक माणूस गाडीजवळ आला, त्याने त्याची पॅन्टची चैन उघडली आणि अश्लील कृत्ये करू लागला. त्यावेळी मी फक्त १०-१२ वर्षांची होते आणि इतकी घाबरले होते की मला काय करावं हे कळत नव्हतं. मला वाटलं तो गाडीचा दरवाजा उघडेल. या भीतीने मी घाबरले, थरथर कापत होते. मी शांतपणे दार लावून घेतलं. मग आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर तो निघून गेला."
त्यानंतर पुढे जेमी म्हणाली, "ही घटना इतकी भयानक होती की मला धक्काच बसला. मी माझ्या पालकांना किंवा मित्रांना याबद्दल सांगितलं नाही, कारण मला नक्की काय घडलं ते समजलं नव्हतं. त्यावेळी मी आणि माझी मैत्रीण दोघीही भीतीने गप्प बसलो होतो." असा खुलासा करत जेमीने तिच्या आयुष्यातील वाईट अनुभवाबद्दल खुलासा केला.