अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) एकामागोमाग एक सिनेमांमध्ये दिसत आहे. आधी 'वेदा' आणि आता नुकत्याच आलेल्या 'द डिप्लोमॅट' सिनेमामुळे तो चर्चेत होता. या सिनेमातील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली. तर आता त्याचा 'तेहरान' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामनिमित्त त्याने एका मुलाखतीत वेगवेगळ्या सिनेमांवर त्याच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यावरही चर्चा केली. 'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे आपण कधीच बनवणार नाही असं तो म्हणाला.
राजकारण आणि सिनेमांचे विषय यावर त्याला प्रश्न विचारण्यात आला. 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत जॉन अब्राहम म्हणाला, "मी उजव्या विचारणीचा नाही आणि डाव्या विचारसरणीचाही नाही. माझं माझ्या देशावर प्रेम आहे. ते मी माझ्या सिनेमांमधून दाखवतो. विशेषत: तरुणांना प्रभावित करतील असे सिनेमे मी बनवतो. मला आपल्या देशाकडून, लोकशाहीकडून खूप आशा आहे. आपल्या देशाचं नक्कीच चांगलं होईल अशी मी नेहमीच आशा करतो."
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवशील का? यावर जॉन म्हणाला, "मी छावा पाहिलेला नाही. त्यामुळे मी त्यावर बोलू शकत नाही. तो सिनेमा लोकांना खूप आवडला हे आपण पाहिलंच. तसंच लोकांना 'द काश्मीर फाईल्स'ही आवडला. पण मी हेच सांगायचा प्रयत्न करतोय की जेव्हा अतिराजकीय वातावरणात लोकांना प्रभावित करण्याच्या उद्देशाने सिनेमे बनवले जातात आणि त्यांना तसे प्रेक्षक मिळतात हे भयावह आहे. मला कधीच असे सिनेमे बनवण्याची इच्छा झाली नाही. आणि मी कधी बनवणारही नाही. हे तसंच झालं जसं की मी अडल्ट कॉमेडी आता बनवू शकत नाही. अशा सिनेमांची निर्मिती करणं किंवा त्यात काम करणं माझ्यासाठी कठीण आहे."
जॉन अब्राहम हा मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्याने लूकमध्येही बदल केले आहेत.