पत्नीला खुश करण्यासाठी पतीदेव काहीही करण्यासाठी तयार असतात. कारण पत्नीला खुश ठेवण्यातच खरं शहाणपण हे जगातील कोणताही पती सांगेल. त्यातच हे पती-पत्नी हिंदी चित्रपटसृष्टीचे स्टार असतील तर पतीवरील जबाबदारी आणखी वाढते. कारण सा-या जगाच्या नजरा त्यांच्यावर असतात. त्यामुळं आपल्या स्टार पत्नीला खुश ठेवण्यासाठी ना ना शक्कल लढवाव्या लागतात. त्यातल्या त्यात आपल्या या स्टार पत्नीला खुश करण्याचा चित्रपटसृष्टीतला प्रचलित फंडा म्हणजे त्यांना महागड्या वस्तू गिफ्ट करणं. यामुळं या स्टार पतीदेवांच्या खिशाला कात्री लागत असली तरी या महागड्या गिफ्ट्समुळे पत्नी खुश होते शिवाय त्याची चित्रपटसृष्टी आणि माध्यमांमध्येही तितकीच चर्चा होते. एक नजर टाकूया अशाच स्टार पतीदेवांनी आपल्या स्टार पत्नीला दिलेल्या महागड्या गिफ्ट्सवर. हिंदी चित्रपटसृष्टीचा मुन्नाभाई अर्थात अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांचं एकमेंकांवरील प्रेम सर्वश्रुत आहे. त्यातच संजूबाबाच्या गैरहजेरीत मान्यतानं आपल्या मुलांची विशेष काळजी घेत त्यांचं पालनपोषण केलं. त्यामुळंच याची परतफेड म्हणा किंवा मान्यतावरील आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी संजय दत्तने तिला तब्बल ३ कोटी रुपयांची रोल्स राॅयल्स ही महागडी कार गिफ्ट केली. हिंदी चित्रपटसृष्टीचं आणखी एक कपल ज्यांच्यावर सा-यांच्या नजरा असतात ते म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा. सुरुवातीपासून लाड आणि ऐशोआरामात वाढलेल्या शिल्पासाठी तिचा पती राज कुंद्रानं लग्नाचं खास गिफ्ट दिलं. दुबईच्या बुर्ज-खलिफा या जगातील सगळ्यात उंच इमारतीच्या १९व्या मजल्यावरील फ्लॅट आपल्या लाडक्या पत्नीला गिफ्ट म्हणून दिला. हे कमी होतं म्हणून की काय आयपीएलमधील राजस्थान राॅयल्सची टीम खरेदी करुन शिल्पाला गिफ्ट केली. प्रेमाचं प्रतीक ताजमहलच्या सौंदर्यानं अनेकांना भुरळ घातलीय. त्यात आणखी एका व्यक्तीची भर पडलीय. ती व्यक्ती म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीचा सिंघम म्हणजेच अभिनेता अजय देवगण. नुकतंच अजयने पत्नी काजोलला ताजमहालचे नक्षीकाम केलेली साडी गिफ्ट म्हणून दिली.या साडीत काजोलचं सौंदर्य आणखी खुलून गेलं होतं. मात्र त्यावेळी साडीसोबतच अनेकांचं लक्ष वेधून घेतलं ते काजोलच्या ब्लाऊजनं. ब्लाऊजवरील ताजमहलच्या प्रतिकृतीचं सोनेरी नक्षीकाम. ही साडी काजोलसाठी खास बनवून घेतली होती. खरंच मान गये अजय तुला आणि तुझ्या या पत्नी प्रेमाला. मिस्टर पर्फेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानची प्रत्येक गोष्ट खास असते. सिनेमा असो किंवा सामाजिक जीवन अथवा मग वैयक्तीक जीवन, आमिर जे काही करतो त्याची आपसुकच चर्चा होते. त्यातच आमिरचं पत्नी किरण राववरील प्रेम जगापासून लपून राहिलेलं नाही. ब-याच पार्ट्या आणि कार्यक्रमात दोघंही एकत्र पाहायला मिळतात. आमिरचं पत्नी प्रेम एवढ्यावरच संपत नाही.नुकतंच आमिरनं आपल्या लाडक्या पत्नीला अमेरिकेतील बेव्हेर्ली हिल्स इथं हाॅलिडे होम गिफ्ट केलं. यासाठी आमिरच्या खिशाला तब्बल ७५ कोटी रुपयांची कात्री लागली. मात्र पत्नी प्रेमापुढं आमिरला त्याची पर्वा नाही.
जो बिवी से करे प्यार,वो कैसे करे इसका इन्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2016 12:22 IST