सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिक चित्रपटांचा ट्रेंड पाहायला मिळतो आहे. कुणी खेळाडूवर चित्रपट बनवतोय तर कुणी दिग्गज किंवा राजकीय व्यक्तीवर. आता दिवंगत दाक्षिणात्य अभिनेत्री व तामीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बायोपिकमधून त्यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित 'द आयर्न लेडी' या बायोपिकचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.
जयललिता यांनी कलाक्षेत्रासोबतच राजकारणातही आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. 'द आयर्न लेडी' या बायोपिकद्वारे कलाक्षेत्र ते राजकारण या प्रवासात त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घडामोडींवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शनी करणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर दाक्षिणात्य चित्रपट निर्माते मुरुगदास यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केले आहे.
मुरुगदास यांनी बॉलिवूडमध्ये आमीर खानचा 'गजनी' आणि अक्षय कुमारचा 'हॉलिडे' यासारख्या दमदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता ते जयललितांवर आधारित या बायोपिकवर काम करणार आहेत. या बायोपिकमध्ये कोणते कलाकार असणार हे अजून अद्याप समजलेले नाही. मात्र दाक्षिणात्य अभिनेत्री वारालक्ष्मीने याबाबत ट्विट केले होते, की तिला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जयललिता यांची भूमिका अभिनेत्री नित्या मेनन साकारणार आहे. प्रियदर्शनी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नित्या मेननबद्दल सांगितले व म्हणाले की नित्या मेनन व्यतिरिक्त इतर कलाकारांची नावेदेखील लवकर जाहीर करणार आहोत. या चित्रपटाच्या पोस्टरवर अमेरिकन महिला नेता हिलेरी क्लिंटन यांचे जयललिता यांच्याबद्दल केलेले वक्तव्य पाहायला मिळते आहे. त्या म्हणाल्या होत्या की, जयललिता अतुलनीय व दृढ नेत्या आहेत आणि महिला सक्षमीकरणाच्या अवतार आहेत. जयललिता यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.