Join us
Daily Top 2Weekly Top 5

जावेद अख्तर यांनी 'बॉर्डर २'ची गाणी लिहिण्यास दिला नकार; स्पष्टच म्हणाले- "जुन्या गाण्यांची रिमिक्स..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 12:38 IST

बॉर्डर २ ची गाणी लिहिण्यास जावेद अख्तर यांनी नकार दिला आहे. स्पष्टपणे त्यांनी कारण सांगितलं आहे. काय म्हणाले?

बॉलिवूडचे दिग्गज गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी सनी देओलच्या बहुप्रतिक्षित 'बॉर्डर २' या चित्रपटासाठी गाणी लिहिण्यास स्पष्ट नकार दिला आहे. १९९७ मध्ये आलेल्या मूळ 'बॉर्डर' चित्रपटातील "संदेशे आते है" यांसारखी अजरामर गाणी देणाऱ्या जावेद अख्तर यांनी सध्याच्या बॉलिवूडमधील गाणी बनवण्याच्या पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, निर्मात्यांनी त्यांना 'बॉर्डर २' या चित्रपटासाठी गाणी लिहिण्याची ऑफर दिली होती. मात्र, जेव्हा त्यांना कळाले की या चित्रपटात जुन्या गाण्यांचे रिमेक किंवा रिक्रिएशन केले जाणार आहे, तेव्हा त्यांनी या प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले, "जेव्हा तुम्ही जुन्या लोकप्रिय गाण्यांची धून वापरून केवळ शब्द बदलता किंवा त्याच गाण्यांना नवा साज देता, तेव्हा त्यात कोणत्याही प्रकारची क्रिएटिव्हिटी राहत नाही. मला अशा कामात रस नाही."

जावेद अख्तर यांनी सध्याच्या रिमिक्स आणि रिक्रिएशनच्या ट्रेंडवर जोरदार टीका केली. त्यांच्या मते, आजच्या काळात नवीन आणि दर्जेदार संगीत तयार करण्याऐवजी जुन्या गाण्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याकडे निर्मात्यांचा कल वाढला आहे. "संगीतकार आणि गीतकारांनी स्वतःचे नवीन काहीतरी निर्माण केले पाहिजे. दुसऱ्याने आधीच बनवलेल्या उत्कृष्ट कामात फेरफार करणे हे कलात्मकदृष्ट्या योग्य नाही," असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.

'बॉर्डर २' या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग करत असून, यात सनी देओलसोबत वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. मूळ 'बॉर्डर' चित्रपट आणि त्यातील जावेद अख्तर यांची गाणी आजही लोकांच्या मनावर राज्य करतात. मात्र, आता जावेद अख्तर यांनी या सीक्वलमध्ये सहभागी होण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये थोडी नाराजी असली, तरी त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :जावेद अख्तरबॉलिवूडटेलिव्हिजन