Join us

जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 10:30 IST

३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर जान्हवीने संतप्त पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor)  ग्लॅमरस लूकमुळे कायम चर्चेत असते. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लाडकी लेक जान्हवीने 'धडक' सिनेमातून पदार्पण केलं. आज ती बॉलिवूडच नाही तर साऊथ इंडस्ट्रीही गाजवत आहे. जान्हवी आज एक स्टार अभिनेत्री असली तरी ती अनेकदा समाजात घडणाऱ्या गोष्टींवर भाष्य करत असते. ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर जान्हवीने संतप्त पोस्ट शेअर केली आहे

जान्हवी कपूर ही एक प्राणीप्रेमी आहे. तिच्या सोशल मीडियावरूनही हे वेळोवेळी दिसून येतं की तिला कुत्र्यांवर (dogs) विशेष प्रेम आहे. तिच्या घरी काही पाळीव कुत्रे (pets) आहेत.  ती त्यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ नियमितपणे इंस्टाग्रामवर शेअर करत असते. अशातच ३० लाख रस्त्यावरील कुत्र्यांना मारण्याच्या मोरोक्को सरकारच्या निर्णय कळताच तिनं संताप व्यक्त केलाय. जान्हवी कपूरने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर यासंदर्भातील एक न्यूज रिपोर्ट शेअर करत या क्रूर निर्णयाचा निषेध केला आहे.

तिनं लिहलं, "हे खरंच असू शकत नाही. भटक्या प्राण्यांचे पुनर्वसन करण्याचे अनेक पर्याय आहेत. त्यांना ठार मारून जर स्वच्छता करता येत असेल, तर तो गुन्हा आहे", असं म्हणत संताप व्यक्त केला.जान्हवीच्या या संवेदनशील आणि स्पष्ट भूमिकेचे अनेकांनी समर्थन केलंय. अनेक प्राणीप्रेमींनी तिच्या पोस्टला रीपोस्ट करत सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे.

२०३० साली होणारा फिफा फुटबॉल विश्वचषक मोरोक्को, स्पेन आणि पोर्तुगाल देशांत खेळला जाणार आहे. जगातील फुटबॉलची सर्वात मोठी स्पर्धा म्हणून याकडे पाहिले जाते. कोट्यवधी क्रीडाप्रेमी हे सामने पाहायला येत असतात. या पार्श्वभूमीवर मोरोक्कोने देशात स्वच्छतेचे अभियान राबविले आहे. मात्र यासाठी त्यांनी ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याचा निर्णय घेतला आहे.  या निर्णयावर आता जगभरातून टीका होऊ लागली आहे. फिफा वर्ल्ड कपसाठी देशाची प्रतिमा 'स्वच्छ' ठेवण्याच्या नावाखाली लाखो निरपराध प्राण्यांना ठार मारण्याचा निर्णय हा केवळ अमानुषच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक ह्युमन राईट्स आणि अ‍ॅनिमल वेल्फेअर संस्थांनी देखील या कृतीचा निषेध केला आहे.

 

टॅग्स :जान्हवी कपूरफिफा विश्वचषक २०१८फुटबॉल