Join us

‘संतोषी माता’ म्हणून पूजल्या गेलेल्या ‘या’ अभिनेत्रीच्या वाट्याला आला दुर्दैवी शेवट...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 18:58 IST

पतीच्या निधनानंतर नैराश्यानं ग्रासलं. पुढे आजारपणं आलं... संपूर्ण शरीरावर पांढरे डाग पडले...

ठळक मुद्देसंतोषी माता बनून जगत जननीची भूमिका साकारणा-या अनिता ख-या आयुष्यात मात्र कधीच आई बनू शकल्या नाहीत. याची त्यांना शेवटपर्यंत खंत होती.

70 च्या दशकात ‘जय संतोषी मां’  (Jai Santoshi Maa )हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला होता. वाचून आश्चर्य वाटेल पण या सिनेमाने बजेटच्या 100 पट कमाई केली होती. या सिनेमातील एक चेहरा एका रात्रीत सुपरस्टार झाला होता. होय, आम्ही बोलतोय ते अभिनेत्री अनिता गुहा यांच्याबद्दल. अनिता गुहा  (Anita Guha)यांनी ‘जय संतोषी मां’ या सिनेमात संतोषी मातेची भूमिका साकारली होती. खरे तर त्यांची भूमिका मोजून 20 मिनिटांची होती. पण ‘जय संतोषी मां’ रिलीज झाला आणि अनिता गुहा एका रात्रीत स्टार झाल्यात. असे म्हणतात की, या सिनेमानंतर लोक खरोखर त्यांना संतोषी माता समजून त्यांच्या पाया पडत.आज अनिता गुहा आपल्यात नाहीत.  20 जून 2007 रोजी हृद्यविकारामुळे अनिता यांचे निधन झाले. आज त्यांच्याच बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अनिता यांना लहानपणापासूनच मेकअपची आवडत होती. शाळेत जातानाही त्या मेकअप करून जात. यामुळे अनेकदा त्यांना मारही खावा लागला होता.

 अनिता यांनी वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी करिअरला सुरुवात केली होती. 50च्या दशकातील एका सौंदर्य स्पर्धेत सहभागी  झाल्या होत्या. येथूनच त्यांच्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात झाली होती. या स्पर्धेच्या निमित्ताने त्या मुंबई आल्या आणि 1955 साली आलेल्या ‘तांगेवाली’ या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

 पुढे देख कबीरा रोया, शारदा आणि गूंज उठी शहनाई या सिनेमांमध्ये त्यांनी काम केले. यापश्चात त्यांना ‘जय संतोषी मां’ या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमात काम करण्यास त्यांनी होकार दिला खरा. पण तोपर्यंत  यांनी कधीही संतोषी मातेचे नाव ऐकले नव्हते.  सिनेमात काम करत असताना हा सिनेमा एवढा गाजेल, असे त्यांना वाटले नव्हते. पण सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला. स्त्रिया अनिता यांना संतोषी माता समजून त्यांची पूजा करु लागल्या होत्या. इतकेच नाही तर लोक  प्रवेशद्वारावर चपल-बुट काढून नंतर चित्रपटगृहामध्ये प्रवेश करु लागले होते. 

‘जय संतोषी मां’नंतर  जय द्वारकाधीश आणि कृष्णा कृष्णा  या पौराणिक सिनेमांमध्ये त्यांनी कामही केले.  पण एकाच धाटणीच्या भूमिका करण्याची त्यांची इच्छा नव्हती. म्हणून त्यांनी वेगळ्या धाटणीचे सिनेमे करायला सुरुवात केली होती. पण त्यांचे सिनेमे फ्लॉप ठरु लागले. यानंतर अनिता यांनी लग्न करुन सिनेसृष्टीला अलविदा केले.

अभिनेते माणिक दत्तसोबत त्यांनी लग्न केले. संतोषी माता बनून जगत जननीची भूमिका साकारणा-या अनिता ख-या आयुष्यात मात्र कधीच आई बनू शकल्या नाहीत. याची त्यांना शेवटपर्यंत खंत होती.काही वर्षांनंतर अनिता यांच्या पतीचे निधन झाले आणि त्या एकट्या पडल्या. याचदरम्यान  ल्युकोडर्मा या आजाराने त्यांना ग्रासले. या आजारामुळे त्यांच्या संपूर्ण शरीरावर पांढरे डाग पडले होते. हे डाग लपवण्यासाठी अनिता हेवी मेकअप करायच्या. पण पुढे पुढे जो मेकअप  त्यांना इतका आवडायचा, त्याच मेकअपची त्यांना घृणा वाटू लागली होती. पण शरीरावरचे पांढरे डाग लपवण्याचा नादात त्या शेवटपर्यंत हेवी मेकअपमध्ये वावरल्या.  मृत्यूनंतरही हे डाग कोणाला दिसू नये,अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे अंत्यसंस्काराआधी माझे मेकअप केले जावे, अशी अंतिम इच्छा त्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तिंजवळ बोलून दाखवली होती. त्यांची ही अंतिम इच्छाही पूर्ण केली गेली.

टॅग्स :बॉलिवूड